![]()
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन भूमीत आनंद तीर्थ समवशरण येथे सुरू असलेल्या समर्पण चातुर्मासात शुक्रवारी जिनेश्वरी अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात अहिल्यानगरसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो महिलांनी सहभाग घेतला. ‘अहिल्यानगरकी गलियों में कमाल हो गया, सबको गुरु आनंद का दीदार हो गया’ या भक्तिगीताने परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, उपाध्याय प्रवर पूज्य प्रवीणऋषीजी महाराज, पूज्य तीर्थेशऋषीजी महाराज, पूज्य आलोकऋषीजी महाराज, महासती पूज्य सत्यप्रभाजी महाराज व पूज्य अमितज्योतीजी महाराज यांच्या सान्निध्यात हे अधिवेशन झाले. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे महासचिव पूज्य गोविंददेवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. पूज्य प्रवीणऋषीजी महाराज म्हणाले, ‘जिज्ञासेतूनच नवीन ज्ञान प्राप्त होते.’ तीर्थंकरांची अद्भुत वाणी व ऊर्जा आपल्याकडे असून त्यांचे गुणगान व्हावे. आग्रह सोडला तरच अनुग्रह प्राप्त होईल. जिनेश्वरी अनुष्ठानातून भक्तीची ‘झोळी’ मजबूत करण्याचा संदेश त्यांनी दिला. पूज्य गोविंददेवगिरीजी महाराज यांनी अनुष्ठानात सहभागी महिलांना वंदन करत, या उपक्रमातून पुढील पिढीला योग्य संस्कार मिळतील, असे सांगितले. आचार्यश्रींच्या प्रेमाच्या आठवणीही त्यांनी व्यक्त केल्या. समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी मुंबईचे उद्योगपती व अहिल्यानगरचे सुपुत्र सौरभ बोरा, राखी सौरभ बोरा, प्रमिला बोरा, पराग बोरा व बोरा परिवार आहेत. अध्यक्ष अशोक बोरा यांनी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरत असल्याचे सांगितले. शेवटी मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. जिनेश्वरी अनुष्ठानासाठी विविध भागांतून आलेल्या हजारो महिलांनी एकत्रित सहभाग घेतला. साधू-साध्वीजींच्या सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यात भक्तिगीत, धार्मिक विधी आणि प्रवचनामुळे आनंद तीर्थ समवशरणचा परिसर भक्तिमय झाला.
Source link
अनुष्ठान:2500 महिला, एक भक्तीभाव; आनंदतीर्थात ‘जिनेश्वरी’चा महासोहळा