येत्या ३ नोव्हेंबर रोजी बारामतीमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी माहिती दिली.
.
पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असेल?
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता बारामती विमानतळावर उतरतील. त्यानंतर तेथून ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.
४ टनी भव्य पुतळा आणि हस्तमुद्रांचे दर्शन
विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये गौतम बुद्धांचा एक अतिशय भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन तब्बल ४ टन असून, अशा आकाराचा आणि वैशिष्ट्यपूर्ण पोझमधील पुतळा इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्या सभागृहात हा पुतळा बसवण्यात आला आहे, तिथे बुद्धांच्या विविध हस्तमुद्राही लावण्यात आल्या आहेत. या प्रत्येक हस्तमुद्रेचा नेमका अर्थ काय आहे, याची सविस्तर माहिती तिथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजमाता जिजाऊंसह महापुरुषांची भव्य पेंटिंग्ज
या वास्तूचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे, गौतम बुद्धांचा पुतळा ज्या वास्तूमध्ये बसवण्यात आला आहे, त्या वास्तूचा गोलाकार भाग संपल्यानंतर आणखी एक वर्तुळाकार (राऊंड) भाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात लोकोत्तर काम करणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे.
येथे राजमाता जिजाबाई यांच्यासह राज्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांची अतिशय उत्तम दर्जाची पेंटिंग्ज साकारण्यात आली आहेत. या प्रत्येक पेंटिंगची साईझ ५ बाय ९ फूट (५ फूट रुंद आणि ९ फूट उंच) इतकी मोठी आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य अनावरण सोहळ्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यक्रमाचे कोणा-कोणाला निमंत्रण?
या कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रमुखांसह खासदार पार्थ पवार आणि उद्योगपती सायरस पुनावाला यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती पवारांनी दिली.
शरद पवार आज बारामती, दौंडमधील दुष्काळाची पाहणी करणार
दरम्यान, शरद पवार आज बारामती आणि दौंड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. तसेच पाझर तलाव, कॅनॉल आणि अन्य जलस्रोतांमधील सद्यस्थितीतील पाण्याचा आढावाही पवार घेणार आहेत. दरम्यान, काल पवारांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.

हेही वाचा..
शरद पवारांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा:म्हणाले- शेतकरी संकटात, सरकारने तातडीने मदत करावी; कर्जमाफी, वीजबिल माफीसह 5 प्रमुख मागण्या

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज पुरंदर तालुक्यातील ‘परिंचे’ गावात त्यांनी गावकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या दौऱ्यात शरद पवार यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या १०० टक्के कर्जमाफीसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. सविस्तर वाचा
पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे:आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत

१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या राजकारणासह आगामी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा