![]()
“भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे केवळ निवृत्तीनंतर चष्मा लावून वाचण्याचे ग्रंथ नसून, दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षण यशस्वी आणि सार्थक करण्याचे ते शाश्वत विज्ञान आहे. मानवाचा आदिम काळ ते आधुनिक विचारवंत युवाल नोव्हा हरारी यांच्या मांडणीपर्यंत संपूर्ण जागतिक तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष एकच आहे. ज्ञानेश्वरी ही कालही दिशादर्शक होती, आजही मार्गदर्शक आहे आणि उद्याच्या पिढीसाठीही दीपस्तंभ राहील,” असे परखड आणि विचारप्रवर्तक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. मुंबईत ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आजच्या ‘जेन-झी’ पिढीपर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचवण्याची गरज, विज्ञानाची मर्यादा आणि भारताची जागतिक ओळख यावर सविस्तर भाष्य केले. ज्ञानेश्वरी निवृत्तीनंतर वाचायची गोष्ट नाही; ते जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान अध्यात्माकडे पाहण्याच्या समाजातील दृष्टिकोनावर बोट ठेवताना सरसंघचालक म्हणाले, “मधल्या काळात आपल्याकडे अशी एक चुकीची समजूत निर्माण झाली की भौतिक ज्ञानच सर्वकाही आहे आणि आध्यात्मिक ज्ञान हे केवळ म्हातारपणी, डोळ्यांवर चष्मा आल्यावर निवृत्तीनंतर वाचण्याची गोष्ट आहे. परंतु, तत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग नसेल, तर त्या तत्त्वाला काहीच अर्थ उरत नाही.” “तत्त्वज्ञान म्हणजे मूळ विचार आणि कांडज्ञान म्हणजे त्या तत्त्वाला अनुसरून तत्कालीन परिस्थितीत अचूक कर्म कसे करावे याचे भान. अर्जुन जेव्हा मोहाने ग्रस्त झाला होता, तेव्हा याच उपदेशाने त्याला कर्तव्याची जाणीव करून दिली. परकीय आक्रमणांच्या धामधुमीतही आपला समाज संत ज्ञानेश्वरांच्या याच भक्ती आणि विचारांच्या अधिष्ठानामुळे टिकून राहिला.” आधुनिक विज्ञान आता अध्यात्माच्या उंबरठ्यावर विज्ञानाच्या मर्यादा आणि मानवी प्रगतीवर भाष्य करताना त्यांनी एक मार्मिक दृष्टांत दिला, “आजचा शास्त्रज्ञ म्हणतो की आम्ही देवाविना लॅबमध्ये माणूस जन्माला घालू शकतो, सृष्टीचे गूढ उलगडू शकतो. पण या संदर्भात एक सुंदर किस्सा सांगितला जातो—एक शास्त्रज्ञ ईश्वरासमोर जाऊन म्हणाला की मी तुझ्याविना सर्वकाही नव्याने निर्माण करू शकतो. देवाने त्याला संमती दिली आणि मटेरियल गोळा करण्यास सांगितले. शास्त्रज्ञाने माती गोळा करण्यास सुरुवात करताच देवाने त्याला हटकले आणि म्हटले, ‘थांब, ही माती माझी आहे; तू स्वतःचे मटेरियल आण!’ म्हणजेच संपूर्ण भौतिक विश्वाचा शोध घेता घेता विज्ञान आज शेवटी अध्यात्मापाशीच पोहोचले आहे.” कॉन्शसनेस आणि ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ “आज आधुनिक वैज्ञानिक ‘प्री-एक्झिस्टिंग युनिव्हर्सल कॉन्शसनेस’चा अभ्यास करत आहेत. ज्याला विज्ञान ‘युनिव्हर्सल कॉन्शसनेस’ म्हणते, तेच आपल्या पूर्वजांनी ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ आणि ‘हे विश्वचि माझे घर’ या अनुभूतीतून हजारो वर्षांपूर्वी मांडून ठेवले आहे.” ‘जेन-झी’ पिढी आणि बदलत्या काळाची आव्हाने आजच्या तरुण पिढीच्या जीवनशैलीवर आणि आकलनावर बोलताना भागवत म्हणाले, “‘जेन-झी’ हा आजचा नवा शब्द असला, तरी मीही माझ्या काळात कधीतरी ‘जेन-झी’ होतो आणि माझे आजोबाही त्यांच्या काळात तसेच होते. काळाच्या ओघात परिस्थिती आणि अभिव्यक्ती बदलते, परंतु मानवी प्रकृती आणि जगाचे अंतिम शाश्वत सत्य कधीही बदलत नाही.” “लहान मुलाला आकाशातील चंद्र दाखवताना आपण बोटाने दिशा दाखवतो; जर मुलाने केवळ त्या बोटाकडेच पाहिले तर त्याला चंद्र कधीच दिसणार नाही. तसेच महापुरुषांचे आचार आणि शब्द हे त्या त्या काळातील दिशा दाखवणारी बोटे असतात, आपले लक्ष अंतिम सत्याकडे असायला हवे.” अहंकाराचा पडदा आणि आत्महत्येची मानसिकता “शरीर हा रथ असून इंद्रिये घोडे, मन लगाम आणि बुद्धी सारथी आहे. या रथाचा खरा मालक आत्मा आहे. परंतु, जेव्हा डोळ्यांवर अहंकाराचा पडदा येतो, तेव्हा मन आणि इंद्रियांची ओढाताण होते आणि रथ थेट खड्ड्यात जातो. आज जीवनातील ताळमेळ बिघडल्यामुळे अनेक तरुण लहान संकटातही खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलतात किंवा आत्महत्या करतात. त्यांना सावरण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीतील ज्ञानात आहे.” परदेशात विचारतात तुमची ओळख काय? भारत म्हणजे आत्मतेज! भारताच्या जागतिक भूमिकेवर बोलताना त्यांनी स्वतःचे आंतरराष्ट्रीय अनुभव मांडले. “नुकताच मी तीन देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथे एका ‘इंटरफेथ’ बैठकीत एका विदेशी विचारवंताने जाहीरपणे आवाहन केले की, ‘धर्मांध संघर्ष आणि युद्धांमुळे जग होरपळत आहे, यावर आमच्याकडे उत्तर नाही; भारतानेच आता जगाला शांतीचा मार्ग दाखवला पाहिजे.’ जगातल्या भौतिक प्रगतीचे रूपांतर विनाशात होऊ नये, यासाठी भारताचे हे विचारच मार्गदर्शक ठरू शकतात.” “परदेशात गेल्यावर आपली ओळख ही कुठल्याही जातीची, प्रांताची किंवा भाषेची नसून केवळ ‘भारतीय’ अशी असते. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे त्यात रममाण असणारा. आत्मतेजाच्या प्रकाशात जीवन कसे जगावे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. जामनगरच्या अतिप्रगत ऑइल रिफायनरीच्या मध्यभागी असणारी गणेशाची मूर्ती हीच आपल्या परंपरेचे आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयाचे प्रतीक आहे.” नव्या पिढीसाठी ‘रोज एक ओवी’चा कानमंत्र भाषणाच्या शेवटी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी व्यावहारिक सल्ला दिला, “आजच्या डिजिटल युगात लोकांचा ‘अटेंशन स्पॅन’ खूप कमी झाला आहे. पूर्वी दोन-दोन तास भाषणे ऐकली जायची, आता ती क्षमता काही मिनिटांवर आली आहे. अशा काळात नव्या पिढीला सोप्या भाषेत समजेल अशा डिजिटल माध्यमांतून किंवा ॲपच्या माध्यमातून ‘रोज एक ओवी’ ऐकणे, ती पडद्यावर वाचणे आणि प्रत्यक्ष जगणे आवश्यक आहे.” जीवनातील सकारात्मक बदल “ज्ञानेश्वरीच्या रोजच्या एका ओवीच्या वाचनाने जर आयुष्यातील किमान पाच वाईट सवयी जाऊन पाच चांगल्या गोष्टी अंगी बाणवता आल्या, तरी तो खूप मोठा प्रवास ठरेल. यामुळे व्यक्तीचे, देशाचे आणि संपूर्ण जगाचे कल्याण साधता येईल,” असा विश्वास व्यक्त करत सरसंघचालकांनी संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’चे स्मरण करून आपल्या भाषणाचा समारोप केला. ————————————– हेही वाचा… तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे:आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप “केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ज्ञानेश्वरी कालही दिशादर्शक होती, आजही आहे आणि उद्याही राहील:भौतिकतेच्या पुढे जाऊन जगाला भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाचीच गरज! -सरसंघचालक मोहन भागवत