Headlines

दिवेआगर दुर्घटनेतील 4 जिवलग मित्रांवर आळंदीत एकत्रच अंत्यसंस्कार:देवा, म्हातारपणाच्या काठ्या का हिरावून घेतल्यास? माऊलींचा आक्रोश




दिवेआगर येथील समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांवर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आळंदीतील तन्मय वहिले, कैवल्य वासनकर, प्रणव बनसोडे आणि सुमीत आहिरे या चार जिवलग मित्रांचे पार्थिव आळंदीतील स्मशानभूमीत आणण्यात आले. लहानपणापासून एकत्र वाढलेले, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाटेवरही सोबत असलेले हे चार मित्र एकाच दुर्घटनेत कायमचे दुरावले. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार होत असताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. एकत्र जगले, एकत्रच जग सोडले आळंदीतील ‘विनर्स क्लासेस’चे हे सर्व विद्यार्थी एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. तन्मय , कैवल्य, प्रणव आणि सुमीत हे चौघेही आळंदीतच राहत असल्याने त्यांची घट्ट मैत्री होती. ‘आम्ही एकमेकांची काळजी घेऊ’, असे वचन देऊन या मित्रांनी घरून सहलीला जाण्याची परवानगी मिळवली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शुक्रवारी सकाळी या चौघांचेही पार्थिव आळंदीत आणण्यात आले आणि काही काळ घरी ठेवून त्यांना थेट स्मशानभूमीत नेण्यात आले. जिथे या चारही मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘आम्हाला हा दिवस का दाखवलास?’ स्मशानभूमीत आपल्या पोटच्या गोळ्यांना सरणावर पाहताना या विद्यार्थ्यांच्या आयांनी जो हंबरडा फोडला, त्याने उपस्थितांचीही मने सुन्न झाली. “देवा आमच्यावर हा प्रसंग का आणलास? तळहाताच्या फोडासारखं मुलांना जपलं होतं. तेच आमच्या म्हातारपणाचा आधार होते,” असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश या माता करत होत्या. इतर विद्यार्थ्यांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार याच दुर्घटनेत प्राण गमावलेले सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले हे आळंदीजवळील केळगावचे रहिवासी होते. या दोन जिवलग मित्रांवर शुक्रवारी सकाळी केळगावच्या स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडले. संपूर्ण गावात यावेळी स्मशानशांतता पसरली होती. दुसरीकडे, यश किरण वानखेडे याच्यावर त्याच्या मूळ गावी अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौड याच्यावर श्रीरामपूर येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमीतचा तो हट्ट जीवावर बेतला या दुर्घटनेतील सुमीत आहिरे याला सहलीला जायचे होते, पण त्याच्या आई-वडिलांनी नकार दिला होता. यावरून रुसलेल्या सुमीतने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि परवानगी दिल्याशिवाय बाहेर न येण्याचा हट्ट धरला. अखेर मुलाच्या हट्टापुढे नमते घेत, मित्रांचे नंबर घेऊन वडिलांनी त्याला सहलीला पाठवले. पण, हाच हट्ट त्याच्या जीवावर बेतला. वासनकर कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला १८ वर्षीय कैवल्य वासनकर याच्या मृत्यूने वासनकर कुटुंबाचा वंशाचा दिवाच विझला आहे. मूळचे अमरावतीचे असलेले हे कुटुंब सध्या आळंदीत राहते. कैवल्यचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये असतात, तर आई शिक्षिका आहे. अभ्यासात अत्यंत हुशार आणि मित्रांच्या मदतीला धावून जाणारा कैवल्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अकरावीत शिकणाऱ्या कैवल्यच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवारातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिवेआगर दुर्घटनेचे काही फोटोज…
—————— ही बातमी पण वाचा.. दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना: सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *