![]()
“जर्मनीत जे काही ‘अँटी-जर्मन’ होते, त्यावर हिटलरने बंदी घातली होती. त्याच हिटलरशाहीच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आता देशातील शिक्षण व्यवस्थेतून मनुवादाला विरोध करणारे पुरोगामी विचार हद्दपार करण्याचा कुटील डाव आखत आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार वगळण्याचा किंवा बॅन करण्याचा प्रयत्न झाल्यास, ‘रिडल्स इन हिंदुइझम’ आंदोलनाप्रमाणे संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,” असा आक्रमक आणि थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना ॲड. आंबेडकर यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुख्य निवडणूक आयोगावर चौफेर टीका केली. हिटलरची कॉपी करून पुरोगामी विचारांवर बंदीचा घाट! शिक्षणातील अभ्यासक्रम बदलाच्या कथित हालचालींवर बोट ठेवताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मोहीम चालवण्यात आली की, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार हे मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात आहेत. त्यामुळे ज्या ज्या विद्यापीठांमध्ये हे विचार शिकवले जातात, त्याची समीक्षा करून ते वगळले पाहिजेत. धक्कादायक बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देत ‘आम्ही हे तपासणार आणि जे मनुवादाच्या विरोधात असेल त्यावर निर्णय घेणार’ अशी भूमिका घेतली. हा देशातील विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे.” हिटलरशाहीची पुनरावृत्ती “हिटलरने स्वतःला हवे ते बॅन करण्यासाठी जे अँटी-जर्मन आहे त्यावर बंदी आणली होती. हे लोक ओरिजिनल थिंकर्स नसून केवळ हिटलरचे ‘कॉपी मास्टर’ आहेत. त्यांना शिक्षण व्यवस्थेतून पुरोगामी विचार हद्दपार करून पुन्हा एकदा मनुस्मृतीचे राज्य आणायचे आहे.” ‘रिडल्स इन हिंदुइझम’च्या लढ्याची आठवण ठेवा! इतिहास सांगताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना जुन्या संघर्षांची आठवण करून दिली, “यापूर्वी शिवसेनेने स्वतःच्या राजकीय वाढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘रिडल्स इन हिंदुइझम’ पुस्तकावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी फुले, शाहू, आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरली आणि अखेर शासनाला ते पुस्तक प्रकाशित करावेच लागले. बाबासाहेबांचे विचार कधीही बॅन करता येणार नाहीत.” गुलामीविरुद्ध नवा संघर्ष “मनुवाद म्हणजे महिला, शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिकदृष्ट्या गुलाम आणि कैदी बनवणारी व्यवस्था आहे. आजचा समाज कोणाचीही गुलामी स्वीकारायला तयार नाही. आपले स्वातंत्र्य आणि संविधान वाचवण्यासाठी जी काही मोठी किंमत मोजावी लागेल, ती मोजायला आम्ही तयार आहोत.” मोहन भागवतांची भाषा दुटप्पी; गोधराबाबत वाघेलांच्या विधानाचा दाखला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अल्पसंख्याकांविषयी एकीकडे वेगळे वक्तव्य करतात, तर दुसरीकडे समाजात तेढ निर्माण केली जाते. ही दुटप्पी भाषा लोकांनी वेळीच ओळखली पाहिजे. खडा टाकून अंदाज घ्यायचा आणि मग वादाला सुरुवात करायची, ही संघाची जुनी रणनीती आहे.” “हिटलरने ज्याप्रमाणे ज्यूंची कत्तल केली, तसाच प्रकार विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत अवलंबला जात आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी थेट वक्तव्य केले की, ‘गोधरा रेल्वेचा डबा बाहेरून नव्हे तर आतून जाळला गेला होता.’ भाजप आणि संघाचा विरोध करणाऱ्यांना संपवण्याचा हा एक मोठा कट आहे.” काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कचखाऊ भूमिकेवर ताशेरे विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी तरुणाईला पुढे येण्याचे आवाहन केले, “भाजप आज जनतेच्या दबावामुळे घाबरलेला आहे; मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) जी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, ती दुर्दैवाने दिसत नाही. विरोधकांमध्ये ताकद आणि एकी दिसत नसल्यामुळे भाजपचे फावले आहे.” आयोगावर अविश्वास, तरुणांनी लढा हाती घ्यावा “केंद्रीय निवडणूक आयोगावर आमचा काडीमात्र विश्वास नाही. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या नव्या पिढीने (जेन-झी) आता चळवळीची सूत्रे आपल्या हातात घेतली पाहिजेत. हीच तरुणींची ताकद भाजप आणि संघाला रोखू शकते. कोणत्याही तडजोडीशिवाय लढण्याची क्षमता केवळ याच विचारसरणीमध्ये आहे,” असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी व्यक्त केला. ——————————————————- हेही वाचा… तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे: आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप “केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून भाजप-संघाची नवी चाल!:शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार अभ्यासक्रमातून वगळण्याचा डाव; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका