Headlines

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना:1 लाख रिक्षांचे वाटप करणार, प्रताप सरनाईकांची घोषणा




राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून नव्या योजनेची आखणी करण्यात येत आहे. शेतीतील उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या परिस्थितीत पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांना रिक्षा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने तब्बल 1 लाख रिक्षांचे वाटप करण्याचा सरकारचा विचार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारकडून हा प्रस्ताव विचाराधीन आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरवर्षी 20 हजार रिक्षांचे वाटप या प्रस्तावित योजनेनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण 1 लाख रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, एकाच वेळी सर्व रिक्षांचे वाटप न करता दरवर्षी 20 हजार रिक्षा देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत 1 लाख रिक्षा वितरित करण्याची योजना असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. या योजनेचा लाभ राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, रिक्षा खरेदीसाठी शेतकऱ्यांवर संपूर्ण आर्थिक भार पडू नये, यासाठी कर्ज आणि अनुदानाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. 90 टक्के कर्ज, 10 टक्के अनुदान रिक्षा खरेदीसाठी लागणाऱ्या एकूण रकमेपैकी 90 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर उर्वरित 10 टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रिक्षा खरेदी करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. याशिवाय, योजनेतून रिक्षा मिळणाऱ्या लाभार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारले जाणारे (RTO) शुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव आहे. यामुळे रिक्षा खरेदी आणि नोंदणी प्रक्रियेतील आर्थिक भार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या घरांप्रमाणे लॉटरी पद्धतीने निवड या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जांची संख्या उपलब्ध रिक्षांच्या तुलनेत जास्त असल्यास लाभार्थ्यांची निवड म्हाडाच्या घरांच्या सोडतीप्रमाणे लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला रिक्षा मिळेलच असे नाही. उपलब्ध कोट्यानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. दरम्यान, या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पुढे सुरू होईल. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रतेचे निकष आणि कर्ज वितरणाबाबतची सविस्तर माहिती त्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 9 फेब्रुवारीपासून योजनेला सुरुवात करण्याचे नियोजन या योजनेच्या सुरुवातीसाठी 9 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. 9 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, त्याच दिवसापासून या रिक्षा वाटप योजनेची सुरुवात करण्याचा सरकारचा विचार आहे. या उपक्रमाला ‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे. रिक्षा त्याच जिल्ह्यात चालवावी लागणार या योजनेतून रिक्षा मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना ती संबंधित जिल्ह्यातच वापरता येणार आहे. म्हणजेच ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला रिक्षा मंजूर होईल, त्या जिल्ह्यातच त्याला रिक्षा चालवावी लागणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. या अटीमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. हेही वाचा… सत्तेत येण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्धाचा अजेंडा: शरद पवार दाऊद इब्राहिमचे मित्र; मला अनेकांचा इतिहास माहिती- प्रकाश आंबेडकर देशातील राजकीय पक्ष विकले गेले आहेत. शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे मित्र आहेत. मी अनेकांचा इतिहास सांगू शकतो; हा सर्व इतिहास आरएसएसच्या लोकांनी स्वतःकडे ठेवला आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, इथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे गुलाम करण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे संविधानच नाही, तर स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *