![]()
कोणताही मोठा उद्योगधंदा नाही, जीन प्रेस सोडली तर दुसरे कृषीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी जगणे कठीण झाले आहे. पावसाच्या प्रचंड तुटीमुळे शेतीचे अर्थशास्त्र कोलमडून गेले आहे. उत्पादन खर्चही निघण्याची शाश्वती नाही. वऱ्हाडात अकोटला पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचा पेरा केला जातो आणि सर्वाधिक भाव सुद्धा दिला जातो. मात्र, यावर्षी पावसाने हुलाकावणी दिल्याने पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची परिस्थिती अत्यंत विदारक असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अकोट तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पऱ्हाटीच्या पिकावर संकट ओढवले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिके सुकू लागली असून, त्यातच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. पावसाच्या लहरीपणाचा थेट परिणाम पऱ्हाटीच्या वाढीवर झाला आहे. पिकाला आवश्यक कालावधीत पुरेसा पाऊस न मिळाल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पाने कोमेजून पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. कपाशीची बोंडे भरण्याचा हा काळ आहे. मात्र, पावसाअभावी कपाशीच्या झाडाला लागलेली कपाशीची बोंडे भरण्याऐवजी सुकून गळत आहेत. आधीच वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उत्पादन घटण्याचे संकट उभे ठाकले आहे. किडीच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता : पावसाअभावी कमकुवत झालेल्या पऱ्हाटीच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके व औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र, उत्पादनाची हमी नसल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. विविध कीडनाशकांच्या किंमती सुद्धा वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. पावसाची कमतरता व किडींचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास पऱ्हाटीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रा. डॉ. सतीश निचळ, पीकेव्ही, अकोला. जिल्ह्यात पावसाचा ६० दिवसांचा खंड पडला आहे. याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. बहुतांश भागातील कापसाचे पीक कोमेजले आहे. हलक्या जमिनीतील पिकाचे यामुळे २० ते ३० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु पाणी शोषण्यासाठी पिकांची मुळे खोल गेल्याने शेतकऱ्यांनी घाबरून पीक मोडू नये. सोय असल्यास संरक्षित पाणी द्या. पोटॅशियम नायट्रेटची (१३:०:४५) फवारणी करावी. यामुळे ताण सहन करण्याची क्षमता वाढून पातेगळ व बोंडगळ थांबते. डवरणी करुन जमिनीतील भेगा बुजवाव्या. महागडे फवारे व खर्च टाळा. योग्य दरासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा द्या ^कोणताही उद्योजक त्याने तयार केलेल्या मालाची किंमत ठरवतो, ते स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नाही. सरकार हमीभाव ठरवते, पण तो ठरवताना बियाणे, खते, कीडनाशकांच्या वाढत्या किंमती गृहीत धरत नाहीत. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित विक्री किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही. हे टाळण्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. – रवी वानखडे, शेतकरी, तरोळा, ता. अकोट. शेतकऱ्यांना अटी शर्तींविना मदत करा ^केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. यंदा अकोट तालुक्यातील सोयाबीन, कापूस व मूग आदी महत्त्वाची खरीप पिके करपली आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे अटी शर्तींशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. – प्रशांत पाचडे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
Source link
दुष्काळ:निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन बोंडे भरण्याच्या काळात पऱ्हाटी सुकली