![]()
दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे व शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशीच आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर चुली करून स्वयंपाक करण्यात आला. आंदोलकांनी चटणी-भाकर खात सरकारी धोरणांचा निषेध नोंदवला. यंदा कधी नव्हे, तेवढा शेतकरी व शेतमजूर संकटात सापडला आहे. जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके हातून गेली. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, अद्याप मदत घोषित केलेली नाही. दुष्काळामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, रविवारी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. मदतीच्या अनुषंगाने सरकार शेतकरी, शेतमजुरांकडे असंवेदनशील असल्याची टीका वंचितने केली. या वृत्तीचा निषेध करण्यासाठी दिवाळीच्या दिवशीच चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख प्रमोद देंडवे म्हणाले. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटोळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा आम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा शेळके, नगरसेवक पराग गवई, माजी जिल्हा परिषद सदस्य रामकुमार गव्हाणकर, संजय बावणे, माजी गटनेते गजानन गवई, अजय शेगावकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाकडून अग्रिम ५ हजारांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र ही मदत अपुरी ठरत असल्याने शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाच्या अडचणी वाढल्या आहेत. एका बाजूला पिकांचे नुकसान आहे. दुसरीकडे कर्जाचा डोंगर आहे. तिसरीकडे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची चिंता आहे. अशा दुहेरी संकटात ग्रामीण अर्थव्यवस्था सापडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. गत दोन वर्षांपासून ओबीसी राजकीय आरक्षणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी वंचितने केली आहे. मात्र अद्याप सरकारने मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी आघाडी दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्यातील सत्ताधारी महायुतीला घेरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. दुष्काळी मदतीचा मुद्दा जि.प. निवडणुकीत गाजणार
Source link
दुष्काळाच्या झळा:रस्त्यावर चुली; चटणी-भाकर खात सरकारी धोरणांचा नोंदवला निषेध, सरकारकडून किरकोळ मदत; वंचितसह शेतकरी आक्रमक