Headlines

दुष्काळामुळे निर्णय:डीजे, बँड, ढोलताशांचा खर्च टाळून ४०० कुटुंबांना जार भेट




उत्सवाचा खरा आनंद केवळ जल्लोषात नसून समाजाच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्यात आहे. याच भावनेतून पाळधी खुर्द येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम राबविला. दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे, बँड व ढोलताशांवर होणारा खर्च टाळून त्या रकमेतून प्रभाग क्रमांक ४ मधील एकूण ४०० कुटुंबांना प्रत्येकी एक पाण्याचा जार वाटप करण्यात आला. पाळधी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिनगर येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवारातर्फे जार वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात नागरिकांची गरज ओळखून उत्सवाचा खर्च समाजहितासाठी वापरणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. उत्सवातून आनंद मिळतोच; मात्र त्या आनंदातून गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणे, हे त्याहून मोठे पुण्याचे काम आहे. त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण केला असून, इतर मंडळांनीही अशा विधायक उपक्रमांचा आदर्श घ्यावा असे सांगितले. या वेळी सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट, डिगू माळी, चंदू माळी, गणेश माळी यांच्यासह त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण महाजन यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांनी आभार मानले. या वेळी जीपीएसचे पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी भिल्ल बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवा : पालकमंत्री कार्यक्रमानंतर आदिवासी भिल्ल समाजाच्या बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये घरकुल योजनांचा लाभ, शिधापत्रिका तसेच जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातील अडचणींचा समावेश होता. पालकमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना अर्जांची तातडीने पडताळणी करून शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *