![]()
पुणे शहराच्या नांदेड सिटी पोलिसांनी धायरी येथील रिलायबल केमिकल्स कंपनीच्या गोदामातून मौल्यवान केमिकल्सचे कॅन चोरणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १५४ ऑर्थो फॉस्फोरिक ॲसिडचे कॅन आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील कॅनॉलजवळ असलेल्या रिलायबल केमिकल्सच्या गोदामातून २५ लिटर वजनाचे, पांढऱ्या रंगाचे ‘रॅनकेम’ कंपनीचे ‘ऑर्थो फॉस्फोरिक ॲसिड’चे कॅन चोरीला गेले होते. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. तपास पथकातील पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर आणि मोहन मिसाळ यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धायरी येथील मँपल सोसायटी, धायरीेश्वर मंदिराजवळून संशयित वैभव चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत वैभव बाळासाहेब चव्हाण (वय २६ वर्षे, रा. मँपल रेसिडेन्सी, धायरी), रोहन संतोष इंदुलकर (वय २९ वर्षे, रा. मँपल रेसिडेन्सी, धायरी), आणि निखील तानाजी पवार (वय २३ वर्षे, रा. पोकळे वस्ती, धायरी) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींकडून १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १५४ कॅन आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी पिकअप गाडी जप्त करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-३) सागर कवडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत व त्यांच्या संपूर्ण तपास पथकाने केली.
Source link
धायरी केमिकल कंपनीतून 15 लाखांचे ॲसिड चोरणारी टोळी जेरबंद:20.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक