![]()
प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोरडा गावात घडली आहे. आरोपीने आपल्या चार साथीदारांसह तरुणीच्या घरात घुसून तिच्या आई आणि बहिणीला मारहाण केली. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर ओढत आणून कारमध्ये कोंबले आणि तेथून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपहरण करून पळ काढताना आरोपीने कार भरधाव वेगाने चालवत रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना धडक दिली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींचा पाठलाग सुरू केला. अखेर अंबाजोगाई परिसरात पोलिसांनी आरोपींची कार अडवली. मात्र, यानंतरही हा थरार संपला नाही. मुख्य आरोपीने हातात कोयता घेऊन पोलिसांसमोरच तरुणीला आणि स्वतःला संपवण्याची धमकी दिली. तब्बल अर्धा तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर पोलिसांनी धाडस दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातील वादातून टोकाचे पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील बोरडा गावातील एका तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने आणखी चार साथीदारांना सोबत घेतले आणि थेट तरुणीचे घर गाठले. आरोपी आणि त्याचे साथीदार घरात घुसताच त्यांनी कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तर तिच्या बहिणीवर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. घरात अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आरोपींनी तरुणीला कुटुंबीयांसमोरच जबरदस्तीने घराबाहेर ओढून आणले आणि कारमध्ये बसवले. कुटुंबीयांना सावरण्याची संधीही न देता आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. भरधाव कारने नागरिक आणि वाहनांना उडवले तरुणीचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी कळंब शहरातून भरधाव वेगाने कार पळवण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना या कारने धडक दिली. आरोपींच्या बेदरकार वाहनचालवण्यामुळे रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपहरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. संबंधित वाहनाचा शोध घेत पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी कळंबमधून पुढे अंबाजोगाईच्या दिशेने गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर अंबाजोगाई हद्दीत पोलिसांना आरोपींची कार अडवण्यात यश आले. ‘एकतर मी या मुलीला संपवतो किंवा स्वतःला’; कोयता उगारत धमकी पोलिसांनी कार अडवल्यानंतर मुख्य आरोपीने आक्रमक भूमिका घेतली. त्याने हातात धारदार कोयता घेत पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘एकतर मी या मुलीला संपवतो किंवा स्वतःला संपवतो,’ अशी धमकी देत त्याने पोलिसांसमोरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीच्या हातात धारदार शस्त्र असल्याने तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत सावधगिरीने त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तब्बल अर्धा तास हा थरार सुरू राहिला. आरोपीच्या हातातील कोयत्यामुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांची धाडसी कामगिरी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीला पकडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी थेट आरोपीवर झडप घातली. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीच्या हातातील कोयत्याचा वार गणेश वाघमोडे यांना लागला आणि ते जखमी झाले. मात्र, जखमी होऊनही त्यांनी माघार घेतली नाही. पोलिसांनी धाडसाने आरोपीला नियंत्रणात आणत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे अपहरण झालेल्या तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तरुणीचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गणेश वाघमोडे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. ‘माझे पप्पा कुठे आहेत?’ तरुणीच्या प्रश्नाने सर्वजण भावूक या संपूर्ण घटनेत सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग तरुणीची कारमधून सुटका झाल्यानंतर घडला. पोलिसांनी तिला कारमधून बाहेर काढले, तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. घडलेल्या प्रकारामुळे ती मानसिक धक्क्यात होती. सुटका झाल्यानंतर ती वारंवार ‘माझे पप्पा कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारत होती. या घटनेमुळे ती किती भयभीत झाली होती, याची कल्पना तिच्या या प्रश्नावरून येते. दरम्यान, या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेले इतर तीन साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधातील वादातून घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करणे, तरुणीचे अपहरण करणे आणि पोलिसांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, या प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा… गोकुळवर ताबा मिळवण्याचा हेतू नाही, कोरमचा पेच सोडवण्यासाठीच निर्णय:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य राज्यात यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या अडचणींबाबत शासन संवेदनशील आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचा….
Source link
धाराशिवमध्ये प्रेमसंबंधातून थरारक अपहरण:प्रेयसीच्या घरात घुसून आई-बहिणीला मारहाण, तरुणीला कारमध्ये कोंबले; पोलिसांसमोर कोयता उगारत आरोपीचा अर्धा तास ड्रामा