Headlines

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून तटकरे लक्ष्य:‘झारीतले शुक्राचार्य’ म्हणत रुपाली ठोमरे यांची टीका, महेंद्र थोरवेंचा उपमुख्यमंत्रीपदावरून खळबळजनक आरोप




महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या विधानावरून रुपाली ठोमरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, अर्थ खाते स्वतःकडे घ्यायचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवायचा होता, असा दावा थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे तटकरे यांच्याभोवती राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, मग तटकरे यांनी नकार का दिला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती, असा दावा रुपाली ठोमरे यांनी केला आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांबाबत सुनील तटकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. जर दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, तर सुरुवातीला तटकरे यांनी अशा कोणत्याही चर्चा झाल्या नसल्याचे का सांगितले, असा सवाल ठोमरे यांनी उपस्थित केला. याबाबत बोलताना रुपाली ठोमरे म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असताना तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र, आता नऊ महिन्यांनंतर त्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमागे नेमके कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पार्थ आणि जय पवारांना आपल्या तालावर नाचवण्याचा विचार होता? सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना रुपाली ठोमरे यांनी आणखी एक गंभीर राजकीय आरोप केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेच्या वेळी तटकरे यांना केंद्रीय मंत्रीपदाबाबत कोणतीही शाश्वती नसावी. त्यामुळे त्यांनी त्यावेळी विलीनीकरणाच्या चर्चांना विरोध केला असावा, अशी शक्यता ठोमरे यांनी व्यक्त केली. तसेच, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना आपल्या तालावर नाचवता येईल, असा विचार तटकरे यांनी केला असावा, असे विधानही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व आणि पक्षाच्या भवितव्यावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठोमरे यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘झारीतले शुक्राचार्य सुनील तटकरेच’ पत्रकारांनी रुपाली ठोमरे यांना झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत, असा थेट प्रश्न विचारला. यामध्ये सुनील तटकरे यांचा उल्लेख आहे की प्रफुल्ल पटेल यांचा, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ठोमरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता सुनील तटकरे यांचेच नाव घेतले. प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत या प्रकरणात आपल्याला तशा प्रकारची भूमिका दिसून आलेली नाही. त्यामुळे विनाकारण त्यांचे नाव घेण्यात अर्थ नाही, असेही त्या म्हणाल्या. मात्र, सुनील तटकरे हेच विलीनीकरणाच्या प्रक्रियेतील अडथळा असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना ‘झारीतले शुक्राचार्य’ असे संबोधले. महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर आणखी एक गंभीर आरोप; उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती? दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या जागेवरून हालचाली सुरू होत्या. या काळात सुनील तटकरे यांनी काही आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना गुप्तपणे फोन केले होते, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते. तसेच राज्याचे अर्थ खातेही स्वतःकडे घेण्याची त्यांची इच्छा होती. एवढेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा खळबळजनक दावा थोरवे यांनी केला आहे. थोरवे यांच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व, मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आणि पक्ष संघटनेवरील नियंत्रण या मुद्द्यांवरून राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तटकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष एकीकडे रुपाली ठोमरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवरून सुनील तटकरे यांना लक्ष्य केले आहे, तर दुसरीकडे महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही नेत्यांच्या आरोपांमुळे सुनील तटकरे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे, विलीनीकरणाच्या चर्चांबाबत तटकरे यांनी घेतलेली भूमिका आणि अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाबाबत झालेल्या कथित हालचाली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रुपाली ठोमरे आणि महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांवर सुनील तटकरे काय उत्तर देतात, तसेच विलीनीकरणाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळवर ताबा मिळवायचा हेतू नाही, कोरमचा पेच सोडवण्यासाठीच निर्णय:CM फडणवीसांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादी विलीनीकरणावरही भाष्य राज्यात यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या अडचणींबाबत शासन संवेदनशील आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *