Headlines

धोकादायक शिक्षण:वर्गखोली अपुरी अन् गळक्या छताखाली तिसरीचे धडे; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला




प्रतिनिधी | श्रीगोंदे शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेला स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करून शिक्षण सुरू ठेवले जात आहे. मात्र, आता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी समाजमंदिराच्या किचन रूममध्ये अंगणवाडी भरविण्यात येत होती. ही खोली पूर्णपणे जीर्ण झाल्यानंतर सध्या तिसरीचा वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनातील नव्याने बांधलेल्या किचन रूममध्ये भरविला जात आहे. मात्र, ही खोलीही अपुरी असून पावसाळ्यात छत गळत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था नसल्याने लहान मुलांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. पावसाचे पाणी वर्गात गळत असल्यामुळे अध्यापनात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संबंधित शिक्षकांनी स्वतः कागदी तळवट आणून पत्र्यावर टाकत तात्पुरती उपाययोजना केली आहे. वर्गखोलीच्या एका कोपऱ्याचा भागही उखडलेल्या अवस्थेत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सुसज्ज वर्गखोली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने ही समस्या कायम आहे. त्यामुळे शाळेसाठी स्वतंत्र अंगणवाडी, प्रयोगशाळा आणि तिसरीच्या वर्गासाठी स्वतंत्र वर्गखोली अशा तीन नवीन खोल्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे. १ मार्चला दिला प्रस्ताव; वर्गखोल्यांची अद्याप प्रतीक्षाच १ मार्च २०२६ रोजी आमदार विक्रम पाचपुते यांना शाळेसाठी नवीन वर्गखोल्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सध्या अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असून, स्वतंत्र अंगणवाडी, प्रयोगशाळा आणि तिसरीच्या वर्गासाठी स्वतंत्र वर्गखोली अशा तीन खोल्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद घोडके यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *