![]()
जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव शैलेजा पोखरकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागातील निवृत्त सहसचिव डॉ. पु. ना. गांडाळ, संस्थेचे कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी,भाऊसाहेब पारधे, सुधाकर आरोटे उपस्थित होते. माजी विद्यार्थी व माजी विभागीय आरोग्य अधिकारी गांडाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ध्येय समोर ठेवा व त्यासाठी स्पष्ट दिशा निवडा, यश मिळतेच. दिलेला शब्द पाळायचा, मग कितीही प्रसंग खडतर असो. सतीश नाईकवाडी यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला की पैसा-प्रतिष्ठा यामागे न धावता आपण कसे वागतो, काम करतो यावर करिअर अवलंबून आहे. हार न मानता प्रत्येक संधीचे सोने करा. या कार्यक्रमात ६० एनएमएमएस, पाचवी व आठवी इयत्तेतील शिष्यवृत्तीधारक, लक्षवेध परीक्षा तसेच दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार लहामटे, डॉ. पु. ना. गांडाळ व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य मंगेश खांबेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Source link
ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान