Headlines

नवी मुंबई विमानतळ ठरणार 'इकॉनॉमिक मल्टिप्लायर':विमानतळामुळे क्षेत्राच्या जीडीपीत 1 टक्क्याची भर पडणार, CM देवेंद्र फडणवीसांचा विश्वास




नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीमुळे या परिसराचा बकाल आणि अस्तव्यस्त विकास होऊ नये, यासाठी सिडकोच्या माध्यमातून नियोजनबद्धरीत्या वसवल्या जाणाऱ्या ‘नैना’ (NAINA) या नवीन शहराच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे विमानतळ केवळ एक प्रकल्प नसून क्षेत्राच्या जीडीपीत एक टक्क्याची भर घालणारे इकॉनॉमिक मल्टिप्लायर ठरणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाचा विकास आराखडा आणि निविदा मंजूर होऊनही केवळ शेतकऱ्यांचा सिडकोवरील विश्वास नसल्यामुळे यापूर्वी कामे रखडली होती, या वास्तवाकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण: यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देखील आदरांजली अर्पित करतो. आणि ज्यांनी भूमिपुत्रांचा लढा हा यशस्वी केला ते लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांनाही याठिकाणी वंदन करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिडकोच्या अंतर्गत आपण जे ‘नैना’ (NAINA) एक नवीन शहर वसवतोय, त्याच्या पायाभूत प्रकल्पांचं आज भूमिपूजन याठिकाणी होतंय. आपण ज्यावेळी नवी मुंबईचं एअरपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं काम पुढे गेलं, त्यावेळी निश्चितपणे एक संकल्पना होती की कुठलाही जो विमानतळ तयार होतो… ते केवळ विमानतळ नसतं, तर ते विमानतळ आर्थिक गतीविधीला चालना देणारं एक इकॉनॉमिक मल्टिप्लायर असतं. जीडीपीला 1 टक्क्याचा भर हे एकटं विमानतळ देऊ शकतं नवी मुंबईसारख्या विमानतळामध्ये तर इतकी क्षमता आहे की या क्षेत्राच्या जीडीपीला (GDP) 1 टक्क्याचा भर हे एकटं विमानतळ देऊ शकतं. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं की जर योग्य विकास आपण केला नाही, जर नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास केला नाही, तर विकास तर होईल पण तो बकाल होईल. आणि हा सगळा रायगड, नवी मुंबई, ठाणे परिसर जो आहे, हा मोठ्या प्रमाणात अस्तव्यस्त अशा पद्धतीने विकसित होईल आणि भविष्यात त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. म्हणूनच हा निर्णय झाला की जो नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएंस एरिया, ‘नैना’ हा प्रकल्प याठिकाणी आणायचा. याचा जो इन्फ्लुएंस झोन आहे, त्याचा एकात्मिक पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून त्याला विकसित करायचं. त्या संदर्भात आपण पहिल्यांदा 2015 ला अधिसूचना काढली, 2017 ला 23 गावांची आणि 2019 ला 151 गावांची अधिसूचना काढली. विशेषतः शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून या संदर्भात हा जो काही विकास आराखडा आहे, हा अंतिम टप्प्यावर नेऊन त्याला मान्यता दिली. इथल्या कामांकरता त्याची सुरुवात देखील केली, पण दुर्दैवाने ती कामं होऊ शकली नाहीत. ती कामं का होत नाहीयेत, हे ज्यावेळेस आम्ही समजून घेतलं, त्यावेळी प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आम्हाला सांगितलं की, साहेब तुमचा विकास आराखडा मंजूर झालाय, कामाचे टेंडरही निघालेत, पण शेतकऱ्यांचा विश्वास नाही. 1970 पासनं त्यांचा अनुभव असा आहे की सिडको ही जागा घेते पण देत नाही. आणि आताही तुम्ही सांगताय 40% जागा देणार आहात, पण एकाही शेतकऱ्याला माहिती नाही त्याला जागा कुठे मिळणार आहे. ज्याला जागा दाखवलीये त्याच्या जागेवर तो जाऊन पाहतो तर दुसऱ्याचाच प्लॉट दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की पुन्हा एकदा आपल्यावर अन्याय होणार आणि आपल्याला काही मिळणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदं देण्याचं काम सुरू त्यानंतर एक बृहद अशा प्रकारची बैठक आम्ही घेतली. विशेष बाब म्हणून आपण विशेष अधिकार सिडकोला दिले की अंतिम आराखड्यामध्येही जिथे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, चुकीचे नंबर पडलेले आहेत, जमिनीची मालकी दुसऱ्याची दिसतेय, अशा सगळ्या करेक्शन करता त्यांना आपण मान्यता दिली. हे ठरलं की याचं भूमिपूजन कधी करायचं? ज्या दिवशी शेतकऱ्यांना त्यांच्या हातामध्ये त्यांच्या जमिनीची कागदं देऊ, त्याच दिवशी भूमिपूजन करायचं हा निर्णय आपण घेतला. आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण ती कागदं देणं सुरू केलं. मी, शिंदे साहेब, सुनेत्राताई, आम्ही आपल्याला आज ग्वाही देतो की आपला एक-एक प्रश्न संपेपर्यंत सातत्याने आम्ही आपल्याला उपलब्ध आहोत. नेहमी शेतकऱ्यांची ओरड अशी असते की आम्हाला नेमकं काय मिळणार आहे हे तोंडी सांगतात पण कधी लेखी तुम्ही देत नाही. आज मी सिडकोचं अभिनंदन करेन, हे जे ‘नैना’वर पुस्तक सिडकोनी काढलेलं आहे… याच्यामध्ये कोणाला जागा किती मिळणार, तिथे एफएसआय काय असणार, छोट्या जागा आहेत त्यांना काय मिळणार, अतिक्रमणे आहेत त्यांना काय मिळणार… या सगळ्या गोष्टींची १००% माहिती यात आहे. प्रकल्पग्रस्तांची ‘गीता’ म्हणून या पुस्तिकेकडे तुम्ही बघितलं पाहिजे. नैनाच्या माध्यमातून १५ लाख जॉब्स तयार होतील एकूण या नैनाच्या माध्यमातून १५ लाख जॉब्स तयार होतील. यातले ५ लाख हाय-पेड जॉब्स असतील आणि १० लाख बेसिक पासनं इंटरमिजिएट जॉब असतील. पुढची जी ग्रोथ आहे, पुढचा जो जीडीपी आहे, हा या नैनातनं येणार आहे. आणि निर्माण झालेल्या संधींवर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचाच असला पाहिजे. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे ज्याच्यामध्ये मुंबई आहे, एमएमआर रिजन आहे, पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि नागपूर आहे. असे वेगवेगळे ग्रोथ इंजिन आपण तयार केले आहेत. या ग्रोथ इंजिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रोथ इंजिन कुठलं असणार आहे? तर ते ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर… हे तीन जिल्हे पुढच्या ५० वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन म्हणून काम करताना दिसतील. वरळीवरनं एअरपोर्टपर्यंत एकही सिग्नल असणार नाही यासोबत आज एअरपोर्टच्या कनेक्टिव्हिटी करता चांगल्या प्रकारच्या पुलांचं आपण उद्घाटन केलंय. उरण बायपासचं आपण याठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे. आता आपण नवी मुंबईच्या एअरपोर्टला मुंबईहून येत असताना… पुढच्या ६ ते ८ महिन्यांनंतर वरळीवरनं एअरपोर्टपर्यंत एकही सिग्नल असणार नाही, अशा पद्धतीची फास्ट कनेक्टिव्हिटी या अटल सेतूमुळे तयार केलेली आहे. भविष्यात उत्तम शहर म्हणून आपण नैनाचा विचार करतोय. केवळ रस्ते, लाईट यांनी होणार नाही, तर पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पोशिर आणि काळू सारख्या योजनांना इतक्या वर्षानंतर इतक्या वेगाने आपण मान्यता दिलेली आहे. कोंढाणे सारखे प्रकल्प असतील किंवा नवीन प्रकल्प… हे सगळे प्रकल्प एकत्रित करून पिण्याचं पाणी पोहोचवण्याकरता मुबलक पाण्याचे साठे तयार करायचे, या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. आजचा कार्यक्रम एक नवीन सुरुवात आहे. आता शेतकऱ्यांचं, भूमिपुत्रांचं, सिडकोचं आणि सरकारचं हे जे विश्वासाचं नातं तयार झालंय, या विश्वासातून नवीन विश्व आपण निर्माण करून दाखवू, हा विश्वास तुम्हाला देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *