![]()
नांदेडमधील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मुदखेड तालुक्याच्या माळकवठा येथील शेतकरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कंपनीने कर्जवसुलीसाठी या शेतकऱ्याला दोन दिवस कार्यालयात डांबून जिवे मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हाती न घेण्याचा पवित्रा नातलगांनी केला आहे. तसेच कंपनीच्या कार्यालयासमोरही नातलगांनी आणि ग्रामस्थांनी शनिवारी ठिय्या मांडला. चंद्रकांत यांनी या कंपनीकडून २ महिन्यांपूर्वी १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचे २ हप्ते भरले. मात्र, नापिकीमुळे पुढील हप्ते भरण्यास विलंब झाला. त्यामुळे चंद्रकांत यांना गुरुवारी जबरदस्तीने कंपनी कार्यालयात डांबून ठेवत मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. उत्तरीय तपासणी आणि तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिस नि:पक्षपणे तपास करतील. कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. तपासाअंती कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले. आरबीआयच्या नियमानुसार वसुलीसाठी धमकावणे गुन्हा दुष्काळ जाहीर करताच राज्य सरकारने बँकांना कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले असताना ही घटना समोर आली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँक किंवा खासगी फायनान्स कंपनीने कर्जवसुलीसाठी ग्राहकाला मारहाण किंवा धमकावणे गुन्हा ठरतो.
Source link
नांदेडात फायनान्स कंपनीने शेतकऱ्याला जिवे मारल्याचा आरोप:नातलगांचा ठिय्या, फायनान्स कंपनी कार्यालयात गळफास घेतलेला आढळला शेतकरी