![]()
महिन्याभरापूर्वीच लग्न केलेल्या एका शिक्षक दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा येथील रेवतीनगर भागात घडली आहे. सोनाली (35) आणि मनीष प्रल्हाद गणवीर (38) असे आत्महत्या केलेल्या मृत दाम्पत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि मनीष यांनी 31 ऑगस्ट रोजी कोर्ट मॅरेज केले होते. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते, परंतु कौटुंबिक वादानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. दोघेही गडचिरोलीतील एका खाजगी शाळेत शिक्षक असल्याने त्यांची ओळख झाली होती. दोघे वेगवेगळ्या जातीचे असले तरी ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 31 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा विवाह केला. लग्नानंतर ते गडचिरोलीतच राहत असून, नागपुरातील मनीषच्या वडिलांच्या घरी ते अधूनमधून येत असत. शेजाऱ्यांनी केले दुर्लक्ष सध्या मनीषचे संपूर्ण कुटुंबीय बुद्धगया येथे देवदर्शनासाठी गेले होते. दिवाळी साजरी करण्यासाठी हे दोघे नागपुरात आले होते. शनिवारी दुपारी त्यांच्या घरातून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज आल्याचे शेजाऱ्यांनी ऐकले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आवाज शांत झाल्याने पती-पत्नीत वाद होत असावा असे समजून शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नातेवाईक आल्याने उघड झाली घटना रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मनीषचे जयताळ्यातील नातेवाईक प्रशिक अजय लांडगे (26) त्यांना भेटण्यासाठी रेवतीनगर येथील घरी आले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी अनेकदा दार ठोठावले आणि फोनही केले, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने प्रशिकने टिनाच्या शेडवरून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. खिडकीतून बेडरूममध्ये डोकावून पाहिले असता, मनीष आणि सोनाली दोघेही सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरड करून शेजाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली आणि पोलिसांनाही कळवण्यात आले. ..अन् पोलिसांना दिली माहिती माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नाईकवडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. शेजारी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा तोडण्यात आला. घराची पाहणी केली असता हॉलमध्ये दारूची बाटली आणि दोन ग्लास आढळले, तर बेडरूममध्ये दोघेही वेगवेगळ्या ओढणीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला लटकलेले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवले. प्रशिक लांडगे यांच्या माहितीवरून बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
नागपूर हादरले:दिवाळीसाठी घरी आलेल्या शिक्षक दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट