![]()
तालुक्यातील पळसखेड येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्याची परंपरा असताना यंदा ग्रामसभा आयोजित करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामसभा होणार असल्याने अनेक नागरिक सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित झाले होते. मात्र, ग्रामसेवक तसेच सरपंच यांच्यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला. अखेर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत निषेध नोंदविला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील टेबल-खुर्चाही बाहेर काढण्यात आल्या. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील विकासकामे, निधीचा वापर, विविध योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळणे अपेक्षित असते. मात्र, ग्रामसभा न घेतल्याने गावकऱ्यांना प्रश्न आणि विचारण्याची ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा हिशोब मागण्याची संधी मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे पळसखेडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेचे कोणतेही नियोजन नव्हते स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेण्याचे कुठलेही नियोजन नव्हते व नोटीस सुद्धा काढली नव्हती. ३० तारखेपर्यंत ग्रामसभा घेता येते व याचे नियोजन पुढे करण्यात येईल. – लता गजानन महल्ले, प्रशासक सरपंच, पळसखेड
Source link
नागरिक आक्रमक:15 ऑगस्टची परंपराच मोडली; पळसखेडमध्ये ग्रामसभाच नाही, ग्रामपंचायतीपुढेच केले ठिय्या आंदोलन