![]()
बडनेरा येथील गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायतींनी कार्यक्रमात विशेष रंगत आणत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हेमंत देव होते. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. आनंद इंगोले, शाळा समन्वय समितीचे सभापती डॉ. बळीराम ग्रेसपुंजे, गांधी विद्यालयाचे सभापती रामेश्वर लाड तसेच शाळेचे सभापती रमेश निचत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्राथमिक इंग्रजी माध्यमातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. यावेळी विद्यालयातील एनसीसी पथक, हरित सेना पथक तसेच स्काऊट-गाईड पथकाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत शिस्त, देशप्रेम आणि सेवाभावाचे दर्शन घडविले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नशामुक्ती व कॉपीमुक्तीची शपथ घेत समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. निलीमा देव यांनी ‘वंदे मातरम्’ सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण विद्यालय परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश खूळसाम यांनी केले. यावेळी प्राचार्य विनोद चिंचोळकर, पर्यवेक्षक दिगंबर करडे आणि मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Source link
गांधी विद्यालयात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रप्रेमाचा दिला अनोखा संदेश:विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायतींनी जिंकली मने