Headlines

नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेत गदारोळ:आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्याने अरविंद सावंत आक्रमक, सुप्रिया सुळेंचाही तीव्र आक्षेप




केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, “मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही समोर येईल,” असा रोखठोक इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. “हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नाही,” असे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. आदित्य ठाकरेंच्या नावावरून ठिणगी खासदार अरविंद सावंत हे विधेयकावर आपले मत मांडताना सरकारचा हेतू स्वच्छ नसल्याची टीका करत होते. याच वेळी सत्ताधारी बाकावरून एका खासदाराने मध्येच आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेतला. “जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, अशा व्यक्तीचे नाव अशा पद्धतीने घेणे चुकीचे आहे,” असे म्हणत त्यांनी सुनावले. मी गोध्रा हत्याकांडाचे नाव घेऊ का? सत्ताधाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे अरविंद सावंत प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधारी बाकांकडे रोख करत सुनावले. ते म्हणाले, “तुम्ही जर मर्यादा ओलांडणार असाल, तर लक्षात ठेवा. मी अशा लोकांची नावे घेतली आहेत जे तुरुंगात गेले होते. आता मी ‘तडीपार’ कोण होते त्यांचे नाव घेऊ का? महिलांवरील अत्याचाराची पूर्ण यादीच माझ्याकडे आहे. मी जर बोलायला लागलो तर गोध्रा हत्याकांड आणि ‘एपस्टीन फाईल्स’चे नावही समोर येईल, हे विसरू नका,” असा इशारा अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. नावे कामकाजातून वगळली सभागृहात दोन्ही बाजूंनी आरडाओरड वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तालिका अध्यक्षांनी मध्यस्थी करत परिस्थिती सावरली. आदित्य ठाकरे यांचे नाव संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिल्यानंतर हा गदारोळ शांत झाला आणि अरविंद सावंत यांनी आपले भाषण पूर्ण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *