Headlines

नाशिक-पुणे थेट सेमी हायस्पीड रेल्वेसाठी 29 ला रास्तारोको:गोंदे फाट्यावर आंदोलन, एकाच वेळी समृद्धी-नाशिक पुणे महामार्ग अडवणार




केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय संघर्षामुळेच या प्रकल्पाचा बळी गेल्याचा आरोप सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने केला. या निर्णयाविरोधात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दि. २९ जून रोजी सकाळी ८ वाजता गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक–पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यानंतर रविवारी सिन्नर येथे कृती समितीची बैठक पार पडली. गेल्या तीन दशकांपासून सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि नारायणगाव या सात तालुक्यांतील जनता या रेल्वे मार्गासाठी संघर्ष करत आहे. यापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मूळ सरळ मार्गानेच जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आता थेट प्रकल्पच रद्द करण्यात आल्याने जनतेची फसवणूक झाल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून यापूर्वी आंदोलने स्थगित केली होती, परंतु सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप समितीने केला आहे. का हवी ‘थेट’ रेल्वे?
वेळेची बचत : थेट रेल्वे मार्ग झाल्यास नाशिक ते पुणे हे अंतर अवघ्या दोन तासांत कापता येईल. विद्यार्थी-कर्मचाऱ्यांची सोय : नोकरी आणि शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. शिर्डी मार्गाचा विरोध : शिर्डी-दौंडमार्गे रेल्वे गेल्यास नाशिककरांचा प्रवास लांबणार आहे, जो पूर्णपणे अकार्यक्षम ठरेल. आंदोलनाची धार तीव्र करणार
नाशिककरांच्या हितासाठी शिवसेना तीव्र आंदोलन करेल. पूर्वीच्या थेट मार्गासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारू. – केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (ठाकरे गट) शिवसेना ठाकरे गटाकडूनदेखील शिर्डीमार्गे रेल्वेस कडाडून विरोध; आंदोलनाची हाक
प्रतिनिधी | नाशिकरोड
पुणे शहराशी नाशिकला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रस्तावित असलेला ‘नाशिक-शिर्डी-दौंड-पुणे’ मार्ग नाशिककरांसाठी अन्यायकारक असून, तो रद्द करावा आणि ‘नाशिक-सिन्नर-संगमनेर-राजगुरुनगर-चाकण’ या थेट मार्गानेच रेल्वे व्हावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी पक्षाने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, शहरातील विद्यार्थी आणि तरुणांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. शिर्डीमार्गे रेल्वेचा नाशिककरांना कोणताही लाभ होणार नाही, असा दावादेखील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आंदाेलनाची घाेषणा करताना केला. रेल्वे बाेर्डाकडे बाजू मांडणार
सिन्नर-संगमनेर मार्गे हायस्पीड रेल्वे होणे ही काळाची गरज आहे. आम्ही लवकरच रेल्वे बोर्डाकडे या मागणीचे अधिकृत निवेदन सादर करणार आहोत. शिर्डी-दौंड मार्गे जाणाऱ्या रेल्वेला आमचा कडाडून विरोध कायम राहील. – योगेश गाडेकर, नगरसेवक आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा
या जनआंदोलनात सिन्नर, संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला व तरुण सहभागी होणार असून, तिन्ही तालुक्यांत विविध ठिकाणी एकाच वेळी आंदोलन छेडले जाईल. सरकारने तात्काळ निर्णय मागे घेऊन मूळ रेल्वे मार्गाला मंजुरी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बबन वाजे, हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, संजय शिरोळे यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *