![]()
श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्रीक्षेत्र मुर्डेश्वर-पैठण पायी दिंडी क्रमांक १२ चे पिंपळवाडी (पिराची परिसर) येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने स्वागत केले. घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करत आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या वेळी दिंडीचे चालक-मालक ओंकारगिरीजी महाराज (मुर्डेश्वर संस्थान) तसेच श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी महंत बालयोगी स्वामी विद्यानंदजी महाराज यांचा बबन तागड, प्रयागाबाई तागड व भाऊसाहेब तागड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वारकरी भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. श्रीक्षेत्र मुर्डेश्वर ते पंढरपूर अशी पायी निघालेली ही दिंडी यंदा सलग १४ व्या वर्षी भक्तिभावाने पंढरीची वाट चालत आहे. श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले असून मार्गावरील विविध गावांमध्ये त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात दिंडीचा प्रवास सुरू आहे. दिंडीचे नेतृत्व ओंकारगिरीजी महाराज आणि महंत बालयोगी स्वामी विद्यानंदजी महाराज करत असून दिंडी व्यवस्थापनाची धुरा विठ्ठल महाराज, विनोद महाराज, काकासाहेब महाराज शिरसाठ, ऋषिकेश महाराज घोडके, बद्रीनाथ महाराज कोठाळे, शेषराव महाराज, साहेबराव महाराज, अर्जुन महाराज सांभाळत आहेत.
Source link
पिंपळवाडी येथे मुर्डेश्वर-पैठण पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत:सलग 14 व्या वर्षी दिंडीचा पंढरीकडे प्रवास