![]()
मालेगाव शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २१) उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निमित्ताने मंत्री दादा भुसे व अद्वय हिरे हे प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. संघाच्या १५ जागांसाठी एकूण १ हजार ३९५ मतदारांपैकी १ हजार १८६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सुमारे ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज, सोमवारी (दि. २२) येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मालेगाव शेतकी संघाच्या १५ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल आणि भाजप नेते अद्वय हिरे यांच्या जनशक्ती पॅनलमध्ये थेट सामना रंगला आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे तालुक्यात गेल्या महिनाभरापासून प्रचाराचा धुरळा उडाला होता. शनिवारी प्रचार थांबल्यानंतर रविवारी मतदान पार पडले. येथील या. ना. जाधव महाविद्यालयात मतदानासाठी तीन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. वैयक्तिक सभासदांसाठी दोन तर सोसायटी गटासाठी एक स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, पाच मतदान अधिकारी आणि एक शिपाई अशा सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीसाठी पाच मतपत्रिकांचा वापर करण्यात आला. मतदान केंद्राबाहेर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. काही ठिकाणी समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १२ वर्षांहून अधिक काळानंतर शेतकी संघाची निवडणूक होत असल्याने सभासदांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. रविवारी पार पडली प्रक्रिया; ८५ टक्के झाले मतदान
वैयक्तिक गटातील १ हजार २५८ सभासद मतदारांपैकी १ हजार ५४ मतदारांनी मतदान केले. या गटात ८४ टक्के मतदानाची नोंद झाली. तर सोसायटी गटातील १३७ मतदारांपैकी १३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने या गटात तब्बल ९६ टक्के मतदान झाले. एकूण १ हजार १८६ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज मतमोजणी
मतमोजणी आज (दि. २२) सकाळी ९.३० वाजेपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. यासाठी तीन टेबलांची व्यवस्था व १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली.
Source link
दादा भुसे- अद्वय हिरे शेतकी संघात आमने-सामने:भुसेंचे शेतकरी विकास व हिरेंच्या जनशक्ती पॅनलमध्ये लढत; आज निकाल