![]()
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केलेली एनटीए पॅनेलवरील ‘फिजिक्स’ची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात समोर आली असून, यातून पेपरफुटीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांच्या हाती काही लागू नये म्हणून मनीषा हवालदार हिने कमालीची सावधगिरी बाळगली होती. तिने स्वतः तयार केलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स चक्क जाळून खाक केल्या. तसेच, सहआरोपी आणि जीवशास्त्राची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्याशी केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेस डिलीट करून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, प्रश्नमालिका पाठवण्यासाठी तिने स्वतःच्या फोनसह पतीच्या मोबाईलचाही वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. घरात सापडली लाखांची रोकड २२ मे रोजी सदाशिव पेठेतील मनीषा हवालदारच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात सीबीआयला लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रतींसह १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश आले आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात तिने ही मोठी रक्कम स्वीकारल्याची कबुली दिल्याचे समजते. ‘गॉड’ आणि ‘डॉ. उषा’ या नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकांशी झालेले संवाद आता सीबीआयसाठी महत्त्वाचे धागेदोरे ठरत आहेत. तपासाल वेग; ‘केमिस्ट्री’ तज्ज्ञही रडारवर मनीषा हवालदार हिच्या चौकशीत आता रसायनशास्त्र (Chemistry) विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचे नावही समोर आले आहे. या तज्ज्ञाच्या सांगण्यावरूनच प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची कबुली मनीषा हवालदारने दिली आहे. त्यामुळे एनटीए पॅनेलचे धागेदोरे आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफरपर्यंतच्या प्रक्रियेत ही गळती झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. पुणे ते राजस्थानपर्यंत धागेदोरे या प्रकरणाचा विस्तार आता केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून लातूर आणि राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. डिलीट केलेले चॅट्स आणि डिजिटल माहिती पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआय आता सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे. ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या तेजस शहामार्फत पैशांची देवाणघेवाण आणि प्रश्न वाटपाचे काम कसे चालत होते, याचा सखोल तपास आता सुरू आहे. टेलिग्रामद्वारे कोट्यवधींचा गंडा! ‘नीट’ (NEET) पेपरफुटी घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांनी टेलिग्राम ॲपचा वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे. तणावाखाली असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना लक्ष्य करत भामट्यांनी टेलिग्रामवर ‘लीक पेपर’ आणि ‘१००% यश’ असे ग्रुप्स तयार केले होते. सुरुवातीला ग्रुप प्रवेशासाठी अवघी २०० ते ५०० रुपये फी घेऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर परीक्षेच्या दिवशी सकाळीच मूळ प्रश्नपत्रिका देण्याचा दावा करत ६० हजारांचे टोकन आणि पुढे प्रतिविद्यार्थी १० लाख रुपये उकळण्यात आले. अशा प्रकारे या टोळीने आतापर्यंत तब्बल ५.७४ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डल्ला मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Source link
नीट पेपरफुटी प्रकरण:मनीषा हवालदारने 'गॉड' नावाने सेव्ह केलेला नंबर विद्यार्थ्याचा, सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे