![]()
पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ग्रामदैवत श्री गायकवाड साहेब यांच्या वार्षिक यात्रेस आज, गुरुवार दि. १४ मे रोजी विधिवत पूजेने प्रारंभ होत आहे. सालाबादप्रमाणे वैशाख महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुरू होणारा हा तीन दिवसीय सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडणार असून, यासाठी पंच कमिटीने जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी (गुरुवारी) दिवसभर ग्रामस्थांच्या वतीने देवाला मलिदा आणि श्रीफळ अर्पण केले जाणार आहे. सायंकाळी ७:०० वा. देवाला वाजत-गाजत ‘गलप’ चढविण्याचा विधी पार पडेल. रात्री ८:०० वा. रजनी गोरड यांच्या ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. शुक्रवार, मुख्य दिवस अन् छबिना मिरवणूक, शुक्रवार दि. १५ मे हा यात्रेचा मुख्य दिवस असेल. ग्रामस्थांच्या वतीने देवाची मानाची विधिवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर दिवसभर मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले राहील. सायंकाळी ६:०० वा. देवाच्या छबिन्याची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. रात्री ८:०० वा. वामन पाटोळे मेंढापूरकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होईल. शनिवारी कुस्तीचा जंगी आखाडा यात्रेचा समारोप शनिवारी (१६ मे) दुपारी ४:०० वाजता होणाऱ्या कुस्तीच्या मैदानाने होईल. या आखाड्यात अनेक नामांकित पैलवान सहभागी होणार असून, कुस्ती शौकिनांसाठी ही मोठी मेजवानी ठरणार आहे.
Source link
नेमतवाडीत गायकवाड साहेब यात्रेला आजपासून सुरुवात:तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल