![]()
गुरुवर्य पं. श्रीकृष्ण तथा बबनराव हळदणकर आग्रा घराण्याच्या गायकीचे अग्रणी पथदर्शक होते. आग्रा घराण्याच्या गायकीला लागणारा घुमावदार, बोजदार, जवारीयुक्त त्रिगुणात्मक आवाज कमावता येतो यावर त्यांचा विश्र्वास होता. शास्त्रीय संगीताचे तंत्र त्यांनी कला म्हणूनच शिकविले, अशा आठवणी सुप्रसिद्ध गायिका कविता खरवंडीकर यांनी सांगितल्या. निमित्त होते गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित ‘रस-गुण-गान’ या सप्रयोग संवदात्मक आणि सांगितीक कार्यक्रमाचे. महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कविता खरवंडीकर यांच्याशी सुप्रसिद्ध गायक पंडित हेमंत पेंडसे यांनी संवाद साधला. गुरू म्हणून पंडित हळदणकर यांच्याशी झालेली पहिली भेट, आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये, त्यासाठी स्त्री गायिका म्हणून केली जाणारी तयारी, बंदिशी किंवा तराणा गाताना मोकळ्या जागा भरताना लावले जाणारे सुमधुर स्वर, हळुवारपणे उलगडले जाणारे रागाचे स्वरूप, त्यांचा भाव तसेच अनवट रागांची धून बनवत, रागाचे स्वरूप झिरपवत नेत त्यांची शिकविण्याची हातोटी याविषयीही खरवंडीकर यांनी माहिती दिली. ‘नोम-तोम’ने आवाजत लवचिकता, रंजकता येते. सुरांमध्ये रुक्षता न राहता हळुवारपणा, पुकार जाणवतो अशा मतांवर ते ठाम होते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. सप्रयोग सादरीकरण करताना खरवंडीकर यांनी राग सार नट, देसी, नट बिहाग, जयत कल्याण, च्रंद कंस आदी रागातील बंदिशी व तराणे सुरेलपणे सादर केले. तसेच आग्रा घराण्याची अठरा अंगांपैकी मिंड, मांड, घसिट, जवारी, लागदाट, तराणा विस्तार आदी अंगांचे सादरीकरण करून रसिकांना मोहित केले. अक्षय वर्धावे यांनी राग झिंझोटी, मारुबिहाग यांची झलक दर्शविली. तर पंडित हळदणकर यांचे काही काळ मार्गदर्शन लाभलेल्या पं. हेमंत पेंडसे यांनी तोडीतील तराणा प्रभावीपणे सादर केला. पंडित बबनराव हळदणकर यांचे उपजेच्या क्षेत्रातील काम मोठे होते. तालाच्या अंगाने व्यक्त होताना त्याची सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती, अशा आठवणी तबलवादक धनंजय खरवंडीकर यांनी सांगितल्या. कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
Source link
पं. हळदणकर यांनी संगीततंत्र कला म्हणून शिकविले:गांधर्व महाविद्यालयाच्या ‘रस-गुण-गान’ कार्यक्रमात गायिका कविता खरवंडीकर यांनी सांगितल्या आठवणी