Headlines

पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या 'तेजोमय' दिवाळी अंकाचे लोकार्पण:प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मन आणि बुद्धीसाठी साहित्य जीवनसत्त्वासारखे




शहरीकरणाच्या रेट्यात जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले आहेत आणि स्वतःसाठी वेळ देणे, ही गोष्ट माणूस हरवून बसला आहे. स्पर्धात्मक जीवनात ताणतणाव, दडपणे यांची आव्हाने पेलताना, शरीराबरोबर मन, बुद्धी आणि भावमयता यांची जीवनसत्त्व साहित्यातून मिळतात, याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी येथे केले. समाज अतिसंवेदनशील झाला असताना, डॉक्टरांनी आपले व्यावसायिक अनुभव लेखनातून जरूर मांडावेत. भौतिक श्रीमंतीसह सांस्कृतिक श्रीमंतीचेही आगमन या निमित्ताने व्हावे, असेही ते म्हणाले. समाजामध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने पुणे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘तेजोमय’ आरोग्य दिवाळी विशेषांक प्रकाशन समारंभात प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर जाधव, उपाध्यक्ष डॉ. दीपाली वाघ, डॉ. विक्रांत लाटे, डॉ. रवी पाटील, माजी अध्यक्ष डॉ. दीपा वाघ, नियोजित अध्यक्ष डॉ. डी. बी. शिंदे, सहसंपादक डॉ. रोहन तोडकर, डॉ. नितीन शिंदे, डॉ. मयूरा टेकाडे, डॉ. स्वाती मांडे, डॉ. अनिल खामकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रा. जोशी म्हणाले, असोसिएशनने उत्तम दर्जाचा अंक प्रकाशित केला आहे. सध्या मोबाईलमय जगण्यामुळे सत्त्व आणि स्वत्त्व हरवले आहे. मात्र, काही विशिष्ट गोष्टी, तथ्ये ही त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनीच सांगणे आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून असोसिएशनने सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन देणारा आशय या अंकातून दिला आहे. या निमित्ताने अनेक वैद्यकीय तज्ज्ञ एकत्र आले, ही सकारात्मक गोष्ट आहे. समाजानेही वैद्यकीय तज्ज्ञांचा माणूस म्हणून स्वीकार केला पाहिजे तसेच डॉक्टरांनीही पेशंटमधील केसपेपरपलीकडचे माणूसपण ओळखले पाहिजे. माहितीच्या विस्फोटात फॅमिली डॉक्टर ही संज्ञा संपली असल्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संवाद महत्त्वाचा आहे. ओमप्रकाश दिवटे यांनी समाजोपयोगी आणि चांगल्या विषयावरील अंक, अशा शब्दांत तेजोमय दिवाळी अंकाचे कौतुक केले. वेगळे विषय नेमकेपणाने या अंकातून मांडले आहेत, यासाठी संपादक मंडळाचे अभिनंदन केले पाहिजे, असेही आवर्जून नमूद केले. असोसिएशनच्या सचिव डॉ. सुरुची सूर्यवंशी प्रास्ताविकात अंकाविषयी माहिती दिली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांनी समाजोपयोगी विचारांचा दीपोत्सव जणु या अंकातून मांडला आहे, असे सांगून असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर जाधव यांनी असोसिएशनच्या भावी उपक्रमांची माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *