![]()
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ‘पनीर’ ऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी मेन्यू कार्डवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. नव्या नियमांनुसार, जर एखाद्या पदार्थात खऱ्या पनीरऐवजी वनस्पती तेलापासून बनवलेले ‘चीज ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याला ‘पनीर सँडविच’ म्हणता येणार नाही. त्याऐवजी ‘चीज ॲनालॉग सँडविच’ किंवा ‘अनॅलॉग पनीर’ असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. एफडीएने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १ मे पूर्वी सर्व हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमध्ये आवश्यक बदल करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडच नाही, तर हॉटेलचा परवानाही रद्द होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ‘ॲनालॉग’ हा शब्द अतिशय लहान अक्षरांत लिहून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रशासनाने यावर आक्षेप घेतला असून, स्पष्ट आणि वाचनीय उल्लेख करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. ‘चीज ॲनालॉग’ हे पाम तेल किंवा इतर वनस्पती तेलांपासून तयार केले जाते. पारंपरिक दुग्धजन्य चीजची चव, पोत आणि वितळण्याची क्षमता मिळवण्यासाठी सोया, नट्स, टॅपिओका यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. हे खऱ्या पनीरपेक्षा स्वस्त असून पौष्टिकतेत फरक असतो. काही तज्ज्ञांच्या मते, या ॲनालॉग पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते आणि त्याच्या गुणवत्तेबाबतही शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. या संदर्भात परिपत्रक काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केंद्र सरकारही यावर स्वतंत्र कायदा आणण्याच्या तयारीत असून, सध्या याबाबत जनतेकडून आणि डेअरी उद्योगाकडून सूचना व हरकती मागवण्यात येत आहेत.
Source link
पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग' दिल्यास एफडीएची कडक कारवाई:हॉटेल्सना मेन्यूत स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक