![]()
येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला टोमॅटोच्या खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच टोमॅटो क्रेटच्या बोलीत तब्बल ४,५०० रुपयांचा भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती प्रशांत कड व उपसभापती दत्तू भेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून खरेदी-विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सभापती प्रशांत कड यांनी टोमॅटो विक्रीसाठी आणताना योग्य प्रकारे वर्गवारी, गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. उत्तम गुणवत्ता व व्यवस्थित ग्रेडिंग केलेल्या टोमॅटोला बाजारात चांगला दर निश्चितपणे मिळतो. तसेच शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील व्यवहार पारदर्शक व विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती दत्तू भेरे म्हणाले की, व्यापारी व अडतदारांनी शेतकऱ्यांना बाजारभावानुसार योग्य पैसे वेळेवर दिले पाहिजेत. टोमॅटोची आवक वाढेल, तसे शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बाजार समितीतर्फे पुरवल्या जातील. यावेळी माजी उपसभापती योगेश बर्डे, संचालक गंगाधर निखाडे, कैलास मवाळ, गुलाब जाधव, अरुण अपसुंदे, प्रभारी सचिव जयेश नाठे यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते.
Source link
पहिल्या टोमॅटो क्रेटला 4,500 रुपयांचा भाव:दिंडोरी बाजार समितीत खरेदी-विक्रीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याचे सभापतींचे आश्वासन