Headlines

पाचोड परिसरातील लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडेठाक:शेतकरी चिंतेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट, पावसाची प्रतीक्षा कायम‎




ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पाचोडसह संपूर्ण परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील लहान-मोठे सिंचन प्रकल्प, नद्या, नाले आणि तलाव अद्यापही कोरडेठाकच आहेत. पावसाच्या या प्रदीर्घ दडीमुळे धरणांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही, ज्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात पावसाने अत्यंत निराशा केली. अत्यल्प आणि तुटपुंज्या पावसावर शेतकऱ्यांनी धूळपेरणी व खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कडक ऊन आणि पावसाचा पत्ता नसल्याने उगवून आलेली पिके आता डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. पाचोड परिसरातील मुरमा, दावरवाडी, खेर्डा प्रकल्प, आडगाव जावळे, कोळी बोडखा, केकत जळगाव, रांजणगाव, हर्शी, दादेगाव या ठिकाणच्या लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये नाममात्रही पाणीसाठा उपलब्ध नाही. जलप्रकल्प कोरडे पडल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे.शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची चिन्हे पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास संपूर्ण परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि तालुका प्रशासनासमोर पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास ऑगस्ट महिन्यातच भीषण दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *