![]()
शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर, नांदगाव-चांदवड महामार्गांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, संबंधित यंत्रणा व नगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अशा अपघातांतील पीडितांना भरपाई देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायदेशीर यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच महामार्गांवर गायी, बैल व इतर जनावरे दिवसरात्र वावरत असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री अचानक रस्त्यावर आलेल्या जनावरांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. काही घटनांमध्ये मृत्यूही झाल्याची नोंद आहे.नगरपालिकेकडून जनावरे पकडण्यासाठी मोहिमांची घोषणा केली जाते; मात्र ती प्रभावीपणे राबविली जात नसल्याने पकडलेली जनावरे पुन्हा रस्त्यावर दिसू लागतात. गोसंरक्षण समित्या व स्वयंसेवी संस्था त्यांच्या परीने प्रयत्न करत असल्या तरी जागेचा अभाव, आर्थिक मर्यादा आणि वाढती संख्या यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यापारी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा तयार करून कायमस्वरूपी गोशाळा, जनावरांची नोंदणी, मालकांवर दंडात्मक कारवाई आणि नियमित पकड मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघात होण्यापूर्वीच प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Source link
मनमाडमधील रस्त्यांवर मोकाट जनावरांचे ठाण:अपघातांचे संकट, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मनमाडमध्ये कारवाईची अपेक्षा