![]()
विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा विधायक व सकारात्मक कामांसाठी वापर करावा. द्वेषपूर्ण संदेशांची देवाणघेवाण टाळून ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सजग राहावे, असे आवाहन सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘सायबर सिक्युरिटी’ विषयावरील कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. देविदास बच्छाव तसेच पोलीस हवालदार शरद कुवर उपस्थित होते.पोलीस निरीक्षक योगेश पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या धमक्या, बदनामी किंवा ब्लॅकमेलिंगला घाबरून न जाता तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल सुर्यवंशी यांनी फिशिंग, बनावट ग्राहक सेवा, बँक अधिकारी असल्याचे भासवून ओटीपी मागणे, क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने बनावट आवाज, फोटो किंवा व्हिडिओ तयार करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याचे सांगितले. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा फसवणुकीला सर्वाधिक बळी पडत असल्याने ऑनलाइन आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. नानासाहेब निकम यांनी आभार मानले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. वंदना पाटील, प्रा. गंगा गवळी यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी, पासवर्ड किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नका. क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
Source link
समाजमाध्यमांचा सजगपणे वापर करा; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा:सटाणा काॅलेजमध्ये पोलिस निरीक्षक पाटील यांचे आवाहन