Headlines

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण:ठाण्यात राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांनी दिले न्यायाचे आश्वासन, 2 दिवसांत पुन्हा बोलावले




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत त्यांना न्यायाचे आश्वासन दिले आहे. भेटीत नेमकं काय घडलं? नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे ठाण्यातील बाळकूम येथील हायलँड पार्क परिसरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. याच वेळी राम पूर्णेकर यांनी त्यांची भेट घेतली. या संवादादरम्यान फडणवीसांनी राम यांना धीर दिला. “तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या वडिलांवर कोणताही अन्याय आम्ही होऊ देणार नाही,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. तसेच, या प्रकरणावर अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी फडणवीसांनी राम पूर्णेकर यांना दोन दिवसांनंतर पुन्हा भेटण्यासाठी बोलावले आहे. काय आहे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण? ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख असलेले प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पाच सशस्त्र हल्लेखोरांनी थेट त्यांच्या कार्यालयात घुसून पिस्तुलातून तब्बल सात गोळ्या झाडल्या होत्या. यातील चार गोळ्या पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक हत्याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आतापर्यंत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी एफआयआरमध्ये (FIR) मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांच्याही नावांचा समावेश करण्यात आला आहे. आता राम पूर्णेकर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रयागराज येथून मुख्य आरोपींना अटक, दोन्ही आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत ट्रान्झिट रिमांड शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ ‘टल्ली’ आणि त्याच्यासोबत असलेला हेल्मेटधारी तरुण अमितसिंह ऊर्फ ‘पपलू’ या दोघांना ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या. दोघेही हत्येनंतर रायगडमार्गे उत्तर प्रदेशात पळून गेले होते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील न्यायालयात हजर केल्यानंतर या दोन्ही आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंतचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला. ठाणे पोलिसांनी त्यांना आपल्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात घेतले आहे. ——————— हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 पैकी 4 जागांवर बंडखोरीचे महायुतीपुढे मोठे आव्हान: महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्याने लढत रंगणार
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यातील ४ जागांवर महायुतीत बंडखोरी झाल्याने अधिकृत उमेदवार संकटात सापडले आहेत. विशेषत: पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘नाशिक पॅटर्न’ राबवला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे शक्ती उभी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) नरेंद्र दराडे पराभूत झाले होते. त्याचे उट्टे काढण्यासाठी शिंदेंनी अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *