![]()
नागपूरच्या कोराडी परिसरात पानठेल्यावर झालेल्या किरकोळ वादातून एका २८ वर्षीय तरुणाची दगडाने व चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना २० मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नागपूर-कोराडी सर्व्हिस रोडवरील भारत फर्निचरजवळ घडली. शुभम राजेश बेसरे (वय २८, रा. शिवकृष्णधाम, कोराडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात शुभमचा मित्र अतुल बलराम इवनाते (वय २५) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम बेसरे आणि त्याचा मित्र अतुल इवनाते हे मध्यरात्री घरी परतत होते. काही वेळापूर्वीच एका पानठेल्यावर आरोपींसोबत त्याची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली होती. याच वादाचा राग मनात धरून एकूण सात आरोपी आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराने शुभम आणि अतुलला रस्त्यात गाठले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरांनी शुभम आणि अतुल यांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केले. तसेच, लाकडी दांडके आणि चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या जीवघेण्या हल्ल्याची माहिती मिळताच दोघांनाही गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती शुभम बेसरे याला मृत घोषित केले, तर जखमी अतुलवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मृत शुभमचा मोठा भाऊ सागर राजेश बेसरे (वय ३१) यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षल तेजराम नारे (वय २४, रा. दहेगाव), मयंक मुन्ना मनपे (वय २१, रा. जरीपटका), व्यंकटेश विक्रम बडेल (वय २२, रा. जरीपटका), तेजस उर्फ कोला प्रमोद झोडापे (वय २२, रा. कोराडी), प्रिन्स उर्फ तृषीत संजय चावरे (वय २०), मोहीत धीरज रामटेके (वय २२) आणि पियुष अतुल डोंगरे (वय २०, तिघेही रा. जरीपटका) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोराडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी हर्षल नारे, मयंक मनपे, व्यंकटेश बडेल या तिघांना आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०३, १०९, १९१ (३), १९० आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास सुरू आहे.
Source link
पानठेल्यावरील वादातून नागपूरमध्ये तरुणाची हत्या:तीन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले