Headlines

पिंप्रीराजा येथे मोसंबी मार्केट सुरू होणार:छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसाधारण सभेत ठराव‎




करमाड येथील डाळिंब उपबाजारपेठेच्या धर्तीवर पिंप्रीराजा येथील नियोजित उपबाजारपेठेत मोसंबी मार्केट सुरू करण्याचा ठराव शनिवारी पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके होते. बैठकीच्या प्रारंभी संचालक सुदाम ठोंबरे व सहकाऱ्यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभानंतर बाजार समितीचे सहायक सचिव ए.आर. अधाने यांनी संस्थेच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. यानंतर मुख्य सचिव विजय शिरसाठ यांनी बाजार समितीचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सविस्तर वार्षिक जमाखर्चाचा अहवाल सभेसमोर सादर केला. चालू आर्थिक वर्षात बाजार समितीला ७ कोटी ४४ लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, तर दुसरीकडे विविध विकासकामे व व्यवस्थापनावर १३ कोटी ४८ लाख ३६ हजार ९२६ रुपये खर्च झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षात ६ कोटी ३ लाख रुपयांची तूट निर्माण झाल्याचे सचिव शिरसाठ यांनी स्पष्ट केले. या तुटीबाबत त्यांनी सांगितले की, बाजार समितीने महापालिकेकडे मालमत्ता कर म्हणून ३ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. यावर सभापती श्रीराम शेळके यांनी स्पष्ट केले की, कागदोपत्री तूट दिसत असली तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समितीच्या उत्पन्नात २८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. यावेळी जि.प. सदस्य राधाकिसन पठाडे, नाना पळसकर, कृष्णा नरवडे, शेखर दांडगे, डॉ. बेग, बाळू भोसले, बाबासाहेब गावटे, सुरेश बागल, सुधीर मुळे, बाबासाहेब तुपे आदी उपस्थित होते. सभेत धोरणात्मक निर्णय गट क्रमांक १२ आणि १३ च्या क्षेत्रावर उभारण्यात येणारा मॉल शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मॉलचा ठराव रद्द करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी बाजार समितीमार्फत वसतिगृह बांधण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *