Headlines

पुणेकरांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, महापालिकेने पावणेदोन कोटींचा दंड वसूल केला:आठ महिन्यांत 16 हजार 532 कारवाया; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या सर्वाधिक




सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे यांसह विविध प्रकारे अस्वच्छता करणाºया नागरिकांवर पुणे महापालिकेकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही शहरातील बेशिस्तीला आळा बसलेला नसल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2026 या आठ महिन्यांत महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी तब्बल 16 हजार 532 प्रकरणांमध्ये कारवाई करून 1 कोटी 87 लाख 82 हजार 325 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता केल्याप्रकरणी तब्बल 11 हजार 499 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातून 90 लाख 36 हजार 961 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याखालोखाल उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 2 हजार 821 जणांवर कारवाई करण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांविरोधात 1 हजार 6 कारवाया, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 188 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली. राडारोडा, प्लास्टिकमधूनही लाखोंचा दंड शहरात प्लास्टिकविरोधी मोहीमही राबविण्यात येत असून, आठ महिन्यांत 591 प्रकरणांमध्ये 31 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत 3 हजार 416 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले. बांधकामाचा राडारोडा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी 256 कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून तब्बल 46 लाख 44 हजार रुपयांचा दंड वसूल झाला. कचरा जाळल्याप्रकरणी 49, कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवल्याप्रकरणी 43, गणवेश न घातल्याबद्दल 52, जैववैद्यकीय कचऱ्याबाबत आठ, तर पाळीव प्राण्यांमुळे अस्वच्छता केल्याप्रकरणी सात कारवाया करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात सर्वाधिक दंडवसुली महिनानिहाय आकडेवारीनुसार, मे महिन्यात सर्वाधिक 36 लाख 71 हजार 965 रुपयांची दंडवसुली झाली. या महिन्यात 1 हजार 999 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी फेब्रुवारीत 2 हजार 963, मार्चमध्ये 3 हजार 173 आणि एप्रिलमध्ये 2 हजार 552 प्रकरणांमध्ये कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतर कारवाईची संख्या सातत्याने कमी होत गेली. ऑगस्टमध्ये 1 हजार 322 प्रकरणांमध्ये कारवाई करून 16 लाख 23 हजार 860 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *