![]()
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात फरार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याची एका खंडणीच्या प्रकरणात मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या या प्रकरणात निलेश घायवळ याच्यासह इतर सर्व आरोपींचीही सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. सध्या निलेश घायवळ हा देशाबाहेर युरोपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. 2020 मध्ये निलेश घायवळ कारागृहात असताना हे खंडणीचे प्रकरण घडले होते. यावेळी संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला होता आणि त्यानुसार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीची माघार आणि पुराव्यांचा अभाव खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी (तक्रारदार) आपल्या मूळ आरोपांपासून मागे हटला. मूळ तक्रार पोलिस आणि तपास यंत्रणेच्या दबावाखाली नोंदवण्यात आल्याचा दावा त्याने न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या जबाबातही फिर्यादीने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. याशिवाय इतर साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पुराव्यांच्या अभावामुळे विशेष मोक्का न्यायालयाने घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांना गुंगारा देत परदेशात पलायन गेल्या वर्षी पुण्यातील कोथरूड येथे एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये घायवळ टोळीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू केली होती. मात्र, कारवाईचा सुगावा लागल्याने घायवळ पोलिसांना गुंगारा देत परदेशात फरार झाला. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु पासपोर्टसाठी अर्ज करताना त्याने आपल्या आडनावात ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव वापरल्याचे आढळले आणि याचाच फायदा घेऊन तो युरोपमध्ये पळून गेला. पासपोर्ट जमा करण्याच्या अटीचे उल्लंघन 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, घायवळने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला नाही. याच पासपोर्टचा वापर करून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर त्याने तीन महिन्यांचा व्हिसा मिळवला आणि युरोपला पलायन केले.
Source link
कुख्यात गुंड निलेश घायवळची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता:मोक्का न्यायालयाचा निर्णय; फिर्यादीने न्यायालयात फिरवली साक्ष