Headlines

सिंदगी शिवारात बिबट्याचा वावर:पाच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे निगराणी, शेतकऱ्यांनी आवश्‍यक काळजी घेण्याच्या वन विभागाच्या सूचना




कळमनुरी तालुक्यातील सिंदगी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाने तातडीने पाहणी करून शिवारात पाच ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मंगळवारी ता. २९ वन विभागाचे पथक सिंदगी शिवारात ठाण मांडून आहे. कळमनुरी तालुक्यातील सिंदगी शिवारात सोमवारी ता. २८ बाबाराव मगर यांच्या शेतात काम करतांना शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. त्यानंतर या बाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यावरून विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, कर्मचारी काळे, खंडागळे, सहारे, कऱ्हाळे, अशोक चव्हाण, सिद्दीकी यांच्यासह पथकाने सिंदगी शिवारात भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या वावराच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सोमवारी (ता. २८) दोन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास सिंदगी शिवारातील पाणवठ्याकडे बिबट्या दिसल्यानंतरर मंगळवारी (ता. २९) आणखी तीन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याचा वावर कोणत्या भागात आहे, त्याच्या हालचाली कोणत्या दिशेने आहेत तसेच तो नियमितपणे कोणत्या परिसरातून जातो, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू केला जात आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्‍यक दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. शेतकऱ्यांनी समुहाने शेतात जावे. पहाटे तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे. शेतात जातांना टॉर्च आणि काठी सोबत ठेवावी. शेतातील गोठ्यांमध्ये बांधलेल्या जनावरांची सुरक्षितता वाढवावी आणि रात्रीच्या वेळी जनावरांना शक्यतो सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच बिबट्याचे ठसे, मृत जनावर किंवा अन्य संशयास्पद बाब आढळल्यास त्या ठिकाणी गर्दी करू नये. अफवांवर विश्‍वास ठेऊ नये- मीनाक्षी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बिबट्याच्या शोधासाठी पाच ट्रॅप कॅमेरे बसविण्या्त आले आहे. वन विभागाचे पथक याभागात गस्तीवर राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सोशल मीडियावर बिबट्याबाबत अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये. परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *