![]()
देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यामुळे तब्बल साडेपाच वर्षांनंतर सचिन वाझे याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरुंगात आहे. याच दीर्घ कारावासाच्या आधारावर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला असून कोर्टातील सुनावणीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. असे असले तरी, इतर प्रकरणांमध्येही सचिन वाझे आरोपी असल्याने तो अद्याप तरी तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. दहा आरोपींवर आरोप निश्चित ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांची हत्या, या बहुचर्चित प्रकरणात अखेर 5 वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 आरोपींविरोधात हे आरोप निश्चित केले असून, या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता वाझेला जामीन मिळाला आहे. काय होते अँटिलिया स्फोटक प्रकरण? 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर एक संशयित बेवारस स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. या खळबळजनक घटनेमुळे त्यावेळी संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. एनआयएच्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली ‘स्कॉर्पिओ’ कार आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. मनसुख हिरेन या व्यावसायिकाची, ज्याने ही गाडी आपल्या ताब्यातून आठवडाभरापूर्वी चोरीला गेल्याचा दावा केला होता, 5 मार्च रोजी ठाण्यातील एका खाडीत मृतदेह आढळला. स्फोटके ठेवण्याच्या आणि हिरेनच्या हत्येच्या कटात वाझे यांचा सहभाग होता, असे एनआयएने म्हटले आहे. 4 मार्च रोजी हिरेनची हत्या केल्यानंतर लगेचच मारेकऱ्यांनी वाझे आणि माजी ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ प्रदीप शर्मा यांना फोन केला होता, असा दावा त्यांनी केला. सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयएने कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर यांना अटक केली. तसेच वाझे यांचे निकटवर्तीय एपीआय रियाझुद्दीन काझी (गुन्हे शाखा युनिट प्रमुख) आणि सुनील माने यांनाही अटक करण्यात आली. 11 जून रोजी संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. 17 जुलै रोजी प्रदीप शर्मा आणि मनसुख हिरेनचे कथित मारेकरी- सतीश मुथुकरी व मनीष सोनी यांना अटक करण्यात आली. सुरुवातीला सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, नंतर हा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) आणि त्यानंतर मार्च 2021 मध्ये एनआयएकडे सोपवण्यात आला. आरोपींवर हत्येचा गुन्हा आणि यूए(पी) कायद्याच्या (UA(P) Act) संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Source link
सचिन वाझेला अँटिलिया स्फोटक प्रकरणात अखेर जामीन!:साडेपाच वर्षांनंतर न्यायालयाचा दिलासा; मात्र इतर गुन्ह्यांमुळे तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता कमीच