Headlines

'नारी चेतना' कार्यक्रमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा हुंकार:मसाप आणि साहित्य अकादमीतर्फे कविता वाचन, चार पिढ्यांच्या कवयित्रींनी मांडले विचार




स्त्रियांमधील स्वत्वाचा शोध, आत्मसन्मान, लिंगभान, लेखनस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य, देहभान अशा विविध विषयांवर सूक्ष्म जाणिवा दर्शविणाऱ्या कविता ‘नारी चेतना’ या कार्यक्रमातून सादर ‌झाल्या. स्त्रीविषयक सामाजिक जाणीव, तिला मिळणारी वागणूक, स्त्री जन्माची कहाणी या विषयांना सक्षमपणे मांडत डॉ. नीलिमा गुंडी, मसापच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी, दीपाली दातार, तनवी जगदाळे यांनी कवितांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य अकादमीतर्फे ‘नारी चेतना’ या मराठी कविता वाचन कार्यक्रमाचे परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहा आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य, प्रा. सुधीर गाडे, कार्यवाह सुनील महाजन, डॉ. आशुतोष जावडेकर, सुनेत्रा मंकणी आणि साहित्य अकादमी मराठी परामर्श मंडळाच्या सदस्य स्नेहा अवसरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘ती’, ‘स्वातंत्र्य’, ‘मी लिहिनच लिहिन’, अंजली कुलकर्णी यांनी ‘लपवा छपवी’, ‘किल्ला’, ‘सखी’, दीपाली दातार यांनी ‘भान आले’, ‘झिम पोरी झिम’ आणि काही रुबाया सादर केल्या. तर तनवी जगदाळे यांनी ‘विराणी’, ‘कृष्णा’, ‘रुटिन’ या कवितांचे सादरीकरण केले. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सहयोगाने साकारलेल्या या कार्यक्रमात चार पिढ्यांच्या कवयित्री स्त्रीवादी कविता सादर करत आहेत. स्त्रिया आपल्या अभिव्यक्तीची वाटचाल सातत्याने करत असून त्यात संत कवयित्रीपांसून आधुनिक काळातील कवयित्रींचे टप्पे उलगडले जात आहेत. यातूनच स्त्रियांच्या जाणिवांची आणि संवेदनांची वाटचाल सुरू आहे. प्रास्ताविकात स्नेहा अवसरीकर म्हणाल्या, साहित्य अकादमीतर्फे देशभरात ‘नारी चेतना’ हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये सादर होत असतो. यात महिलांना व्यासपीठ मिळावे हा प्रमुख हेतू आहे. डॉ. नीलिमा गुंडी म्हणल्या, कविता हा सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार असतो कारण, कवीला खोलवर डूब घेऊन लिखाण करावे लागते. त्याच्या भाषेला एक नाद, लय, व्याकरणीसामर्थ्य, शब्दसंग्रह, नवे शब्द आणि नव्या शक्यता निर्माण करण्याची सर्जनशीलता आवश्यक असते. मराठीतील स्त्री काव्यपरंपरा शतकानुशतके अखंडितपणे सुरू आहे. अभंग, ओव्या, अनाम स्त्रियांची गाणी, स्त्रीगीते अशी औपचारिक शिक्षण न घेता सुद्धा भाषाप्रभुत्व दर्शविणाऱ्या स्त्री कवयित्रींची परंपरा आपल्याकडे आहे. स्त्रियांची कविता ही दुबळी आणि स्मरणरंजन आहे असा समज अत्यंत चुकीचा असून स्त्रियांच्या कवितेत स्मरणसंजीवन दिसून येते. डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, कविता ही अणुस्फोटच वाटतो, कारण पहिल्यांदा मनात सुचताना ती स्फोटासारखीच बाहेर येते. देशातच नव्हे तर परदेशातही स्त्रीवर्गाने कवितेतून अभिव्यक्त होणे ही क्रांतिकारक घटना आहे. आजच्या काळातही स्त्रियांना भावना व्यक्त करण्याची मुभा लाभलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *