Headlines

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी ग्वाही, मुरलीधर मोहोळांच्या पाठपुराव्याला यश




पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात वैष्णव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री अश्विनी वैष्णव हे रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान मोहोळ यांनी पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत निर्माण झालेल्या चिंतेची माहिती दिली आणि हा विभाग कायम ठेवण्याची मागणी केली. त्यावर मंत्री वैष्णव यांनी केंद्र सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नसल्याचे स्पष्ट केले. पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला अनेक दशकांची समृद्ध परंपरा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील लाखो श्रोत्यांचे आकाशवाणीशी भावनिक नाते आहे. स्थानिक घडामोडी, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विश्वसनीय बातम्यांचे माध्यम म्हणून आकाशवाणीने दीर्घकाळ लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे हा विभाग कायम ठेवण्याची जनभावना खासदार मोहोळ यांनी मंत्री वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. यावेळी स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आकाशवाणी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. आकाशवाणी अधिक प्रभावी, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट स्थानिक बातम्या आणि जनसंपर्क अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही जवळपास सव्वा कोटी श्रोते नियमितपणे आकाशवाणीवरील बातम्यांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक श्रोत्याच्या मनातील भावना आणि अपेक्षा मी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. आकाशवाणीचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *