Headlines

पुणे जिल्हा परिषद सभागृहात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न:सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला; व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह




पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एका महिलेने सभागृहात पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि सेवकांनी प्रसंगावधान राखत महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना चालू आर्थिक वर्षातील (2026-27) पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आयोजित सभेदरम्यान घडली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच ‘नीट’ परीक्षेत देशात प्रथम आलेल्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरवणी अंदाजपत्रकावरील चर्चा सुरू असतानाच संबंधित महिला अचानक सभागृहात आली आणि आरडाओरडा करत तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून महिलेला ताब्यात घेतले आणि हरकणी कक्षात नेले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. सभागृहात पेट्रोलची बाटली घेऊन महिला कशी पोहोचली, याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित महिलेने माध्यमांशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2007 पासून लग्नाचे आमिष दाखवून 19 वर्षे आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर संबंधित सदस्यांची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सभागृहातील प्रवेश व्यवस्था, सुरक्षा तपासणी आणि सदस्यांकडून सभागृहात मोबाईलवर रील्स चित्रीकरणासंदर्भातही कडक नियमावली करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *