![]()
पुणे विमानतळावर १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे ही वाढ शक्य झाली असून, यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट मिळणार आहे. या नवीन स्लॉट्समुळे पुणे शहर मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या हवाई मार्गांनी जोडले जाईल. या नव्या मार्गांमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर पर्यटन, व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. विशेषतः सोलापूरसारख्या शहराला थेट हवाई जोडणी मिळाल्याने मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “पुणे विमानतळावरील स्लॉट्सची वाढ ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी आहे. नवीन उड्डाणांमुळे उद्योग, आयटी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून आम्ही दुर्गम आणि मध्यम शहरांनाही हवाई नकाशावर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.” पुणे विमानतळ सध्या ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ अंतर्गत नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग आणि जळगाव या महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. या मार्गांमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत होत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला गती मिळत आहे. वाढत्या प्रवासी संख्येला लक्षात घेता, विमानतळावर सुविधा उन्नत करण्याचे कामही सुरू आहे, ज्यात प्रवासी सोयी, सुरक्षा व्यवस्था आणि ऑपरेशनल क्षमता यामध्ये सुधारणा केली जात आहे. १ मे २०२६ पासून नव्याने सुरू होणाऱ्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणे विमानतळ प्रशासन भविष्यातही अधिक मार्ग, वाढीव उड्डाणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून, पुण्याला देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन आणि कनेक्टिव्हिटी हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
Source link
पुणे विमानतळावर 15 नवीन फ्लाइट स्लॉट्सची भर:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे कनेक्टिव्हिटीला चालना