Headlines

भारताला सर्वश्रेष्ठ बनवणे संघाचे ध्येय:नरेंद्र ठाकूर यांचे 'संघशताब्दी मंथन' कार्यक्रमात आवाहन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी भारताला जगात सर्वश्रेष्ठ देश बनवण्याचे संघाचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. पुणे येथे आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. समाजात संघाबद्दल एक मोठी स्पष्टता निर्माण झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम असलेला आणि जगाला नवी वाट, मार्ग व दृष्टी देण्यास समर्थ असलेला भारत घडवण्याचे काम संघाने हाती घेतले आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ठाकूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग प्रचार विभागाच्या वतीने आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि कार्यवाह राहुल पुंडे उपस्थित होते. ठाकूर यांनी सांगितले की, संघाची शाखा केवळ व्यायामाचे ठिकाण नसून ते संस्कारांचे केंद्र आहे. शाखेतून स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवली जाते. सध्या स्वयंसेवक शिक्षण, आरोग्य, सेवा आणि ग्रामविकास यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती आणि सेवा भारती यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजात मोठे बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वयंसेवकाचा भाव स्वार्थाचा नसून परमार्थाचा असतो, असेही त्यांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत, जसे की भूकंप किंवा महापूर, संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी तत्पर असतात. ते जात, धर्म किंवा पंथ न पाहता केवळ माणूस म्हणून मदत करतात. संघाचे कार्य केवळ हिंदू समाजाला संघटित करण्यापुरते मर्यादित नाही, तर या संघटित शक्तीचा उपयोग करून राष्ट्राला परमवैभवाप्रत नेणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *