![]()
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा (Rav Party) मुद्दा प्रचंड गाजत असतानाच, आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तुळापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात सुमारे १०० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये अनेक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईबाबत पुण्याच्या अप्पर पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. आयोजकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुपारी १ ते रात्री ११.३० वाजेपर्यंतची तात्पुरती परवानगी घेतली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मध्यरात्री उशिरापर्यंत ही पार्टी जोरात सुरू होती. नशेचे पदार्थ आणि लाखो रुपयांचे मद्य जप्त गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री जेव्हा या बंगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिथे उपस्थित असलेले बहुतांश तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या आणि दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होते. पोलिसांनी तातडीने या सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा जप्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू अप्पर पोलिस आयुक्त सातपुते यांनी पुढे सांगितले की, “पार्टीमध्ये सहभागी झालेले अनेक तरुण हे २१ वर्षांच्या आतील असण्याची दाट शक्यता आहे. या आयोजकांनी नियमांचे कशा प्रकारे उल्लंघन केले? याचा तपास केला जात असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या व्यक्तीने हा बंगला या पार्टीसाठी उपलब्ध करून दिला, त्याचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का? याचीही पडताळणी केली जात आहे.” तरुणाई कुठून आली? तपास सुरू या रेव्ह पार्टीत पकडण्यात आलेले तरुण-तरुणी नेमके पुण्याच्या कोणत्या भागातून अथवा इतर शहरांतून आले होते, याचा शोध लोणीकंद पोलिस आणि गुन्हे शाखा घेत आहे. सर्व संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून, वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि परिसरातील बेकायदेशीर पार्टी संस्कृतीवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. हे ही वाचा… गोरेगाव पाठोपाठ वरळीच्या NSCI क्लबमध्ये ड्रग्जचा शिरकाव?:लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू, एक गंभीर मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. सविस्तर वाचा…
Source link
पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा:100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात; लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा जप्त