Headlines

पुण्यात रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी:महापालिका हद्दीत 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत आदेश; नियम मोडल्यास कारवाई




दिवाळीच्या काळात रॉकेट आणि तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहरात अशा फटाक्यांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पुणे महापालिका हद्दीत ही प्रतिबंधात्मक बंदी लागू करण्यात आली असून, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तिची अंमलबजावणी होणार आहे. शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या, जुन्या इमारती, झोपड्या, बांबूची घरे तसेच गवत आणि ज्वलनशील साहित्य असलेल्या परिसरात रॉकेटसारखे फटाके उडविल्यामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो. विशेषतः रॉकेट उडविताना त्यांचा मार्ग अनियंत्रित होऊन ते इमारतींच्या छतावर, बाल्कनीत, खिडक्यांमध्ये किंवा झोपड्यांमध्ये पडू शकतात. त्यामुळे मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे आदेशात नमूद केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. पुणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक तसेच खासगी जागांवर रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागानेही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. इतर फटाक्यांचा वापर प्रचलित कायदे आणि सक्षम प्राधिकरणांच्या निर्देशांनुसारच करता येणार आहे. आदेशाची तातडीने आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *