![]()
वाहनांची सुरक्षितता तपासण्यापासून ते आधुनिक कनेक्टेड वाहनांच्या सायबर सुरक्षेपर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) आता विस्तार करत आहे. संस्थेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोसरी येथील केंद्रात अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा पेनिट्रेशन टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत विविध राष्ट्रीय उपक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सीआयआरटीने गुरुवारी (५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत हीरक महोत्सवी वर्षाचा आराखडा जाहीर केला. संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्यासह संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवी सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. १९६७ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि राज्य परिवहन उपक्रमांच्या संघटनेच्या संयुक्त पुढाकारातून सीआयआरटीची स्थापना झाली. वाहन चाचणी, प्रमाणन आणि होमोलोगेशन क्षेत्रात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातील पहिली टायर व व्हील रिम प्रयोगशाळा, वाहन होमोलोगेशनसाठी मान्यता, पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे प्रमाणन आणि भारत एनसीएपीच्या कमांड व कंट्रोल सेंटरची जबाबदारी हे संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. आधुनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, इंटरनेट जोडणी आणि सॉफ्टवेअर अपडेटचा वापर वाढत असल्याने सायबर हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या प्रयोगशाळेत वाहनांचे इलेक्ट्रॉनिक घटक, टेलिमॅटिक्स, इन्फोटेनमेंट प्रणाली आणि वाहनांतर्गत नेटवर्कची सुरक्षा तपासली जाणार आहे. वाहन उत्पादकांना आंतरराष्ट्रीय निकषांनुसार चाचणी व प्रमाणन सुविधाही उपलब्ध होणार आहेत. हीरक महोत्सवी वर्षात कनेक्टेड वाहन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक, ई-रिक्षा, वाहन फिटनेस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वाहनचालक चाचणी यांसंदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सप्टेंबर २०२७ मध्ये राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद आयोजित करून महोत्सवी वर्षाचा समारोप केला जाणार आहे. पत्रकार परिषदेत सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा व व्यवस्थापन विकास केंद्राचे प्रमुख फारुख मखदूम, सुरक्षा व होमोलोगेशन विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश पाठक, ऑटोमोटिव्ह चाचणी विभागाचे प्रमुख संजय साळुंखे, संशोधन व सल्लागार सेवा विभागाचे प्रमुख उमेश सूर्यवंशी, प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख शीबा राणी, तांत्रिक संचालनालयाचे प्रमुख प्रकाश दहिया, रस्ते सुरक्षा कक्षाचे प्रभारी प्रशांत काकडे आणि भारत एनसीएपीचे प्रभारी संकेत धनावे उपस्थित होते.
Source link
पुण्यात सीआयआरटीची वाहन सायबर सुरक्षा प्रयोगशाळा सुरू:सप्टेंबर 2026 ते सप्टेंबर 2027 दरम्यान राष्ट्रीय उपक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम होणार