![]()
पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला असून, लोहगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय 48) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबुरे हा हवाई दलाच्या जवानासारखा गणवेश परिधान करून फिरत असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून अंबुरे याला पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबुरे याने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावरील एका टेलरिंग दुकानातून हवाई दलाच्या जवानासारखा गणवेश शिवून घेतला होता. तसेच, त्याने हवाई दलाचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते. अंबुरे याने हा गणवेश आणि बनावट ओळखपत्र कशासाठी तयार केले, तसेच तो कोणत्या उद्देशाने वावरत होता, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस. शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभय चंद्रकांत हळबे (वय 64, रा. निओ टॉवर, अमानोरा पार्क, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आदित्य (वय 35) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार सिद्धेश संदीप किरटकर (वय 20) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय हळबे अमानोरा पार्क परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या हळबे यांचा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हळबे यांच्या मुलाने नुकतीच फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.
Source link
पुण्यात हवाई दलातील तोतया जवान पकडला:बनावट ओळखपत्र, गणवेश जप्त; लोहगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल