Headlines

पुण्यात 25 लाखांहून अधिक मतदार अर्ज बाद होण्याची शक्यता:मयत, दुबार, स्थलांतरित, अनुपस्थित मतदारांचा समावेश




पुणे जिल्ह्यात मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत वितरित केलेल्या 25 लाखांहून अधिक मतदार अर्जांचे संकलन होऊ शकले नाही. हे अर्ज ‘अनकलेक्टेबल’ म्हणून वर्ग करण्यात आले आहेत, ज्यात मयत, दुबार, स्थलांतरित, ‘नॉट रेडी टू साइन’ आणि अनुपस्थित मतदारांचा समावेश आहे. या ‘अनकलेक्टेबल’ अर्जांमुळे संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ‘अनकलेक्टेबल’ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपले किंवा कुटुंबातील सदस्याचे नाव या यादीत आहे का, याची खातरजमा करावी आणि नाव वगळण्याची शक्यता असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात एकूण 87 लाख 96 हजार 624 अर्जांचे वाटप झाले होते, जे 96.88 टक्के आहे. त्यापैकी आतापर्यंत 51 लाख 50 हजार 480 अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, जे 65.53 टक्के आहे. उर्वरित 25 लाखांहून अधिक अर्ज ‘अनकलेक्टेबल’ वर्गवारीत टाकण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे. ‘अनकलेक्टेबल’ अर्जांमध्ये मयत (मृत), दुबार (एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी), स्थलांतरित (दुसऱ्या ठिकाणी गेलेले), ‘नॉट रेडी टू साइन’ (अर्ज स्वीकारण्यास तयार नसलेले) आणि अनुपस्थित (घरी नसलेले) अशा पाच प्रमुख वर्गांचा समावेश आहे. संबंधित मतदारांचा प्रत्यक्ष ठावठिकाणा लागत नसल्याने किंवा त्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने हे अर्ज संकलित करता आलेले नाहीत. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास, हडपसर मतदारसंघात सर्वाधिक 2,87,450 अर्ज ‘अनकलेक्टेबल’ आहेत, तर खडकवासला मतदारसंघात 2,45,683 आणि वडगाव शेरी मतदारसंघात 2,10,320 अर्ज ‘अनकलेक्टेबल’ आढळले आहेत. कसबा पेठ मतदारसंघात 46,724 अर्ज ‘अनकलेक्टेबल’ आहेत. अंतिम मतदारयादी तयार करताना या मतदारांच्या नावांबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *