![]()
पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शहरातील केंब्रिज चौकाजवळ भरधाव बस पुलाचा सुरक्षा कठडा तोडला आणि ती थेट पुलाखाली कोसळली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या हृदयद्रावक दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कठडा तोडून बस थेट खाली आदळली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन पुण्यातून नागपूरकडे निघाली होती. प्रवासादरम्यान ही बस छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौकातील पुलावरून जात असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस इतक्या वेगात होती की तिने थेट पुलाचा कठडा तोडला आणि ती खाली कोसळली. बस खाली आदळल्याचा आवाज इतका भयंकर होता की, आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रवाशांचा आक्रोश, महिला आणि लहान मुले जखमी या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाने जागीच प्राण गमावले. तर, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून शोक व्यक्त या हृदयद्रावक दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “पुण्याहून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसचा छत्रपती संभाजीनगर येथे झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.” ————— हेही वाचा.. समृद्धीवर प्रथमच भरदिवसा 90 किमी वेगाच्या कंटेनरमुळे कार एकमेकांवर धडकल्या:8 जखमींत 4 गंभीर; 19 कारचा चक्काचूर
समृद्धीवर किनगावराजाजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता ९० किमी प्रतितास वेगातील कंटेनरच्या धडकेने १९ कारचा चक्काचूर केला. यात ८ जखमींमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. समृद्धीवर उभी वाहने ३ किलोमीटर अंतरावरून दिसत असतानाही (दृश्यमानता) कंटेनर धडकला. समृद्धीवर प्रथमच भरदिवसा एवढी वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा
Source link